पुणे, (प्रतिनिधी) २६ एप्रिल - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थ्यांना सायबर कॅफे किंवा संगणकावर अवलंबून राहण्याची गरज नसून, “अण्णासाहेब पाटील महामंडळ अॅप” या मोबाईल अॅपद्वारे संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येणार आहे.
मध्यस्थांच्या फसवणुकीला बसणार चाप
आतापर्यंत महामंडळाची संपूर्ण प्रक्रिया संकेतस्थळावर (Web Portal) उपलब्ध होती. मात्र, तांत्रिक माहितीअभावी अनेक तरुण मध्यस्थांच्या जाळ्यात अडकत होते. यामध्ये आर्थिक फसवणूक आणि वेळेचा अपव्यय होत होता. हे टाळण्यासाठी महामंडळाने आता गुगल प्ले स्टोअरवर स्वतःचे अधिकृत मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. यामुळे नोंदणीपासून ते अनुदान मिळेपर्यंतचा प्रवास थेट लाभार्थ्यांच्या हातात आला आहे.
अॅपमध्ये मिळतील 'या' सुविधा:
सुलभ नोंदणी: नवीन वापरकर्ते मोबाईल क्रमांक, नाव आणि ई-मेलद्वारे ओटीपी पडताळणी करून नोंदणी करू शकतील.
तीन टप्पे एकाच ठिकाणी: इच्छापत्र (LOI), मंजुरी (Sanction) आणि अनुदान मागणी (Claim) या तिन्ही प्रमुख टप्प्यांची कागदपत्रे अॅपवरूनच अपलोड करता येतील.
स्टेटस ट्रॅकिंग: आपल्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे, हे कोणालाही न विचारता मोबाईलवर तपासता येईल.
जिओ-टॅगिंगमुळे येणार पारदर्शकता
या नवीन प्रणालीमध्ये व्यवसायाची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी 'जिओ-टॅगिंग' आणि 'जिओ-फेन्सिंग' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायाचे जिओ-टॅग असलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य असेल. गुगल मॅपच्या साह्याने जिल्हा समन्वयक या व्यवसायाची पडताळणी करतील, ज्यामुळे केवळ पात्र आणि प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांनाच अनुदानाचा लाभ मिळेल.
डिजिटल उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
संगणक प्रणालीवरील सर्वच सोयी-सुविधा आता मोबाईलवर आल्यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण उद्योजकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा आणि मध्यस्थांपासून सावध राहावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर 'Annasaheb Patil Mahamandal App' या नावाने उपलब्ध असून जुन्या नोंदणीकृत लाभार्थ्यांना त्यांच्या विद्यमान 'लॉगिन आयडी' आणि 'पासवर्ड'नेच प्रवेश करता येणार आहे.