छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर बाबाचे वादग्रस्त वक्तव्य... नव्या वादाला फुटले तोंड...

Share:
Main Image
Last updated: 25-Apr-2026

 

नागपूर, (प्रतिनिधी) दि. २५ एप्रिल २०२६

बागेश्वर धामचे पीठासीन पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नागपुरात आयोजित 'भारतदुर्गा शक्तिस्थळ' शिलान्यास समारंभात बोलताना त्यांनी शिवरायांच्या इतिहासाचा संदर्भ देत अजब दावा केला. "छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी आपला राजपाट समर्थ रामदास स्वामींकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती," असे विधान शास्त्री यांनी केले आहे.

नेमका प्रकार काय?

नागपुरातील भारतदुर्गा शक्तिस्थळाच्या भूमीपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अनेक दिग्गज संतांची उपस्थिती होती. या व्यासपीठावरून बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला.

शास्त्री म्हणाले की:

"छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करता करता खूप थकले होते. त्यांना वाटलं की आपण आता थकलो आहोत. ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले, आपलं मुकूट उतरवून त्यांच्या चरणी ठेवलं आणि म्हणाले की, 'आम्ही खूप युद्धं लढलो, आता कृपा करा. आम्हाला आता लढायचं नाही, हे राज्य तुम्ही सांभाळा. आमच्याकडून आता पुढे चाललं जात नाही, आम्हाला विश्राम हवा आहे.'"

Advertisement

शिष्यधर्माचा हवाला देत दावा

शास्त्री यांनी पुढे असाही दावा केला की, महाराजांच्या या मागणीवर समर्थ रामदास स्वामींनी त्यांना गुरु-शिष्याच्या नात्याची आठवण करून दिली. "शिष्याचं कर्तव्य काय? असा सवाल स्वामींनी केला. त्यावर 'गुरुची आज्ञा पाळणे' असं उत्तर महाराजांनी दिलं. त्यानंतर रामदास स्वामींनी पुन्हा ते मुकूट महाराजांच्या डोक्यावर ठेवलं आणि सांगितलं की, 'आजपासून हे राज्य माझं आहे, पण मी आज्ञा देतो की तुम्हीच याचे संचालन करा,'" असा संवाद शास्त्री यांनी उपस्थितांसमोर मांडला.

संघाच्या कार्याशी जोडला संदर्भ

ही घटना सांगताना धीरेंद्र शास्त्री यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्याचाही उल्लेख केला. "ज्याप्रमाणे महापुरुषांनी या भूमीवर जन्म घेतला, तसेच वर्तमान काळात संघाचे प्रमुख (मोहन भागवत) आहेत. त्यांनी भारताच्या गौरवासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. ज्या दिवशी भारतमाता दुर्गा मंदिर पूर्ण होईल, त्या दिवशी भारत खऱ्या अर्थाने शक्तिसंपन्न आणि अखंड होईल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इतिहासाच्या विटंबनेचा आरोप होण्याची शक्यता

ऐतिहासिक संदर्भांनुसार, छत्रपती शिवाजी महाराज कधीही 'थकले' होते किंवा त्यांनी 'विश्रांतीसाठी' राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे पुरावे उपलब्ध नाहीत. उलट, स्वराज्याची स्थापना हा त्यांचा ध्येयवाद होता. बागेश्वर बाबांनी केलेल्या या दाव्यामुळे शिवप्रेमी आणि इतिहासकारांमधून तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही अनेकदा महापुरुषांबद्दलच्या चुकीच्या विधानांवरून महाराष्ट्रात मोठे राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाले आहेत.

 

?s=20

Comments

No comments yet.