मुंबई, (प्रतिनिधी) २४ एप्रिल - वरळी परिसरात भाजप महायुतीने काढलेल्या मोर्चादरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना भररस्त्यात जाब विचारणाऱ्या महिलेच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी आता वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते हिने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या महिलेची ओळख पटली असून 'श्रीमती ग्रेवाल' असे त्यांचे नाव असल्याचे समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी वरळी डोम परिसरात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने मोर्चाचे आयोजन केले होते. ऐन गर्दीच्या वेळी निघालेल्या या मोर्चामुळे वरळी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. यावेळी आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघालेल्या श्रीमती ग्रेवाल या गेल्या तासाभरापासून ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. संतापलेल्या ग्रेवाल यांनी थेट गाडीतून उतरून मंत्री गिरीश महाजन आणि उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
"इथून निघून जा, गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे, हे तुम्हाला समजत नाही का? मोर्चा काढायचा असेल तर खुल्या मैदानात का घेतला नाही?" असा संतप्त सवाल त्यांनी मंत्र्यांना विचारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "वाहतूक कोंडीमुळे लोकांची गैरसोय झाली, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. मी स्वतः त्या महिलेची माफी मागितली. आम्ही १०-१५ मिनिटांत तिथून निघणारच होतो, पण त्या खूप वैतागल्या होत्या. त्यांनी अयोग्य भाषा वापरली आणि रागात बाटलीही फेकली. तरीही मी पोलिसांना त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या आहेत."
झेन सदावर्तेंची तक्रार आणि पोलिसांची कारवाई
एकूणच हा प्रकार शांततेचा भंग करणारा असल्याचे म्हणत झेन सदावर्ते यांनी या महिलेविरुद्ध तक्रार दिली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक शांतता बिघडवल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. दुसरीकडे, विनापरवाना किंवा सार्वजनिक गैरसोय होईल अशा पद्धतीने मोर्चा काढल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी मोर्चाच्या आयोजकांवरही स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे 'ती' महिला?
वाहतूक कोंडीत अडकलेली 'ती' महिला नेमकी कोण, याबाबत मोठी उत्सुकता होती. फ्री प्रेस जनरलने त्यांच्या मर्सिडीज कारच्या क्रमांकावरून त्यांची ओळख पटवली आहे. श्रीमती ग्रेवाल असे त्यांचे नाव असून, त्या एका तासापासून मुलासाठी ट्रॅफिकमध्ये अडकल्याने त्यांचा संयम सुटल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
?s=20