मुंबई, (प्रतिनिधी) २१ एप्रिल - बॉलिवूडची 'मस्तानी' अर्थात दीपिका पदुकोण सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील सुखद धक्का आणि व्यावसायिक जिद्दीमुळे प्रचंड चर्चेत आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दुसऱ्यांदा आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिल्यानंतर, दीपिका आता विश्रांती घेईल असे वाटले होते. मात्र, याउलट दीपिकाने कामाचा धडाका लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
प्रेग्नन्सीमध्येही चित्रीकरणाचा धडाका
दीपिकाने गरोदरपणात कामापासून लांब न राहता आपले उर्वरित प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ती सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'राका' या बहुचर्चित पॅन इंडिया चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. विशेष म्हणजे, या स्थितीतही ती केवळ साध्या सीन्सचेच नाही, तर काही थरारक 'अॅक्शन सीक्वेन्स'चे चित्रीकरण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
'राका' आणि 'किंग'साठी मोठी तयारी
प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा 'राका' हा चित्रपट बिग बजेट असून प्रेक्षकांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे. दीपिका आपल्या कामाप्रती कमालीची प्रोफेशनल असून, ठरलेल्या वेळेत चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी ती मेहनत घेत आहे. 'राका' व्यतिरिक्त शाहरुख खानच्या 'किंग' या चित्रपटातील आपले कामही ती लवकरच पूर्ण करणार आहे.
आरोग्याची घेतेय विशेष काळजी
अॅक्शन सीन्स आणि चित्रीकरणाचा ताण असला, तरी दीपिका आणि चित्रपटाची टीम तिच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड करत नाहीये. सेटवर डॉक्टरांचे पथक आणि विशेष खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्वतः दीपिका देखील आपल्या आहार आणि विश्रांतीकडे विशेष लक्ष देऊन शूटिंग पूर्ण करत आहे.