डीजीसीएचा बडा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात.... पण हा तर केवळ 'छोटा मासा'... अजितदादांच्या अपघाताच्या फाईलचं काय? 

Share:
Main Image
Last updated: 20-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २० एप्रिल - नागरी विमानचालन महासंचालनालयातील (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना झालेल्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. "आम्ही वारंवार सांगत होतो तेच खरं ठरलं," अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. मात्र, ही कारवाई म्हणजे केवळ 'छोटा मासा' पकडणे असून, यामागे टीडीपीला (TDP) इशारा देण्याचे राजकीय गणित असावे, अशी खळबळजनक शंकाही पवारांनी उपस्थित केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
सीबीआयने (CBI) दिल्लीतील डीजीसीए मुख्यालयात 'हवाई पात्रता संचालनालयात' कार्यरत असलेले उपमहासंचालक मुदावथ देवुला यांना अटक केली आहे. एका खासगी कंपनीला ड्रोन आयात करण्यासाठी मंजुरी देण्याच्या बदल्यात २.५ लाख रुपयांची लाच घेतल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित सल्लागार भरत माथूर यांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३७ लाखांची रोकड आणि सोने-चांदी जप्त करण्यात आली आहे.

अजितदादांच्या अपघाताचा संदर्भ
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी डीजीसीएच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. लाच घेऊन कंपन्यांच्या त्रुटींकडे डोळेझाक केली जाते आणि त्यामुळेच विमान अपघात होतात, असा त्यांचा आरोप आहे. या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करून दोन महिने उलटले तरी कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Advertisement

रोहित पवारांचे खळबळजनक आरोप:
आमदार रोहित पवार यांनी या कारवाईवर भाष्य करताना यंत्रणेतील 'दलाली'वर प्रहार केला. त्यांनी म्हटले की:
व्ही. के. सिंग यांच्यावर निशाणा: "लाच देऊन कामे होत असतील, तर दलालीत पटाईत असलेल्या व्ही. के. सिंग यांनी दादांच्या अपघाताची कागदपत्रे कशी 'क्लीन अप' केली असतील, याचा आता अंदाज येतो."
राजकीय मेसेज? : "सीबीआय स्वतःहून ॲक्शन घेते, पण आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करते. हा कदाचित टीडीपीच्या (TDP) मंत्रालयाला दिलेला अप्रत्यक्ष इशारा असू शकतो. म्हणूनच प्रादेशिक अस्मिता बाजूला सारून टीडीपीकडून 'डीलिमिटेशन' संदर्भात केंद्र सरकारचे ऐकले जात आहे का?" अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
यंत्रणेत मोठे मासे: अटक झालेला अधिकारी ही केवळ सुरुवात असून या यंत्रणेत अनेक भ्रष्ट 'मोठे मासे' दडलेले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

राजकीय वर्तुळात खळबळ
डीजीसीएसारख्या संवेदनशील खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा आता केवळ तांत्रिक न राहता राजकीय बनला आहे. एकीकडे भ्रष्टाचारावर कारवाई होत असताना, दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवरून राज्य सरकार आणि केंद्रातील तपास यंत्रणांवर रोहित पवारांनी दबाव वाढवला आहे.

?s=20

Comments

No comments yet.