नाशकात उद्यापासून 'अखिल भारतीय संत परिषद'... कुंभमेळा नियोजनावर मंथन... देशभरातून ३०० संत येणार...

Share:
Main Image
Last updated: 03-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ एप्रिल - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्यापासून (दि. ४) दोन दिवसीय 'अखिल भारतीय संत समिती'ची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत देशातील १३ आखाडे, १२७ संप्रदाय आणि १५९ उपसंप्रदायांचे ३०० हून अधिक प्रतिनिधी, शंकराचार्य आणि जगद्गुरु सहभागी होणार आहेत. कुंभमेळ्याची विकासकामे आणि नियोजनाबाबत या परिषदेत संतांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने परिषदेची सुरुवात होईल. ५ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेला उपस्थित राहून साधू-संतांशी थेट संवाद साधणार आहेत. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपायोजना आणि विकासकामांबाबत मुख्यमंत्री संतांच्या सूचना जाणून घेतील.

तयारीचा घेतला आढावा
या परिषदेच्या पूर्वतयारीसाठी आज 'गंगासभे'ची विशेष बैठक पार पडली. संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज, महापौर हिमगौरीताई आडके, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, विहिंपचे माधवदास राठी, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष अधिकारी संदीप जाधव यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नियोजनाचा आढावा घेतला.

Advertisement

दिग्गज संतांची मांदियाळी
या परिषदेत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी महाराज, महामंत्री श्रीमहंत राजेंद्रदासजी, महामंडलेश्वर जनार्दन हरिजी, मनमोहनदास राधे राधे बाबा, विहिंपचे केंद्रीय संयुक्त महामंत्री अशोक तिवारी, जगद्‌गुरु वल्लभाचार्यजी, राष्ट्रीय अध्यक्ष जगद्गुरू अविचल देवाचार्यजी, श्री महंत ज्ञानदेवसिंहजी, स्वामी शंकरानन्दजी सरस्वती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वारकरी संप्रदायाचा सहभाग
विशेष म्हणजे या परिषदेत वारकरी संप्रदायाचे प्रमुख मानकरी देखील सहभागी होणार आहेत. यामध्ये ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास (पंढरपूर), ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी (पैठण), ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज देहूकर आणि रामानंदाचार्य माउली सरकार यांचा समावेश आहे.

ही परिषद निमंत्रितांसाठीच मर्यादित असून, ४ आणि ५ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परिषदेचे कामकाज चालणार आहे. ५ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील स्थानिक साधू-महंत देखील मोठ्या संख्येने सहभागी होतील.

Comments

No comments yet.