नागपूर, ( प्रतिनिधी) ३० मार्च - नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात अत्यंत स्फोटक दावे केले आहेत. "खरात हा मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पत्नींची अदलाबदल (Wife Swapping) करण्यास सांगायचा," असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या प्रकरणातील धक्कादायक बाबी उघड केल्या.
मंत्रालयातील बडे मासे जाळ्यात?
वडेट्टीवार म्हणाले की, अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी आपल्या पत्नी आणि कुटुंबीयांना घेऊन खरातकडे जात होते. "हे अधिकारी भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालत होते. जे पती आपल्या पत्नीला खरातकडे पाठवत होते, ते तितकेच दोषी आहेत. त्यांच्यावरही जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल व्हायला हवेत," अशी मागणी त्यांनी केली. राज्य सरकार या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास घाबरत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
पेनड्राईव्हमध्ये १००० व्हिडिओंचा साठा
या प्रकरणातील पुराव्यांबाबत बोलताना वडेट्टीवार यांनी दावा केला की, खरातच्या ऑफिसमध्ये सापडलेल्या पेनड्राईव्हमध्ये तब्बल १००० व्हिडिओ आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १५० व्हिडिओ समोर आले असून बाकीचे व्हिडिओ लपवले जात आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "अशोक खरातच्या मोबाईलमध्ये अनेक नेत्यांची नावे कोडवर्डमध्ये आहेत, कारण तो काळा पैसा पांढरा करण्याचे काम करत होता," असेही त्यांनी नमूद केले.
४९ आमदारांच्या चौकशीची मागणी
केवळ रुपाली चाकणकर यांना समन्स देऊन हे प्रकरण थांबवता कामा नये, असे सांगत वडेट्टीवार यांनी चौकशीची व्याप्ती वाढवण्याची मागणी केली. "ज्या ४९ आमदारांचे फोटो अशोक खरातसोबत आहेत, त्या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण महाराष्ट्राची इभ्रत काढणारे आहे," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.
"अनेक मोठ्या लोकांच्या बायका खरातच्या केबिनमध्ये असायच्या आणि त्यांचे नवरे बाहेर बसून राहायचे. हे अत्यंत घाणेरडे प्रकार आहेत. ज्या महिलांवर अत्याचार झाला, त्यांच्या पतींवरही कारवाई व्हायला हवी."
— विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते