पेट्रोल पंपावरील वाहनांच्या रांगा पाहून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 26-Mar-2026

नाशिक ( प्रतिनिधी ) २६ मार्च -  जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी (दि. २६) केले आहे.
गेल्या काही तासांपासून जिल्ह्यात इंधन टंचाई असल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या आहेत. या अफवांमुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करत नागरिकांना दिलासा दिला आहे.
पॅनिक बायिंगमुळे कृत्रिम टंचाई
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, "ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा अखंडित पुरवठा सुरू आहे. मात्र, टंचाईच्या भीतीपोटी नागरिक गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी (पॅनिक बायिंग) करत

Advertisement
आहेत. यामुळे काही पंपांवरील साठा तात्पुरता संपल्याचे दिसत असले तरी, ही परिस्थिती केवळ कृत्रिम आहे. नवीन साठा नियमितपणे पंपांवर पोहोचत असून पुरवठ्यात कोणतीही तांत्रिक अडचण नाही."
प्रशासनाचे आवाहन:
अफवांकडे दुर्लक्ष करा: सोशल मीडियावरील अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नका.
साठा करू नका: गरज नसताना इंधन साठवून ठेवल्यास पुरवठा साखळीवर विनाकारण ताण येतो, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.
संयम राखा: पेट्रोल पंपांवर गर्दी करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
शासकीय माहितीवर विश्वास ठेवा: माहितीसाठी केवळ अधिकृत शासकीय प्रसिद्धीपत्रके किंवा माध्यमांचा आधार घ्यावा.
"जिल्हा प्रशासन इंधन पुरवठ्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित कंपन्यांशी आमचा सातत्याने समन्वय सुरू आहे. नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनाला सहकार्य करावे."
— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक.

Advertisement

Comments

No comments yet.