सावधान! राज्यात गारपिटीचा इशारा... या जिल्ह्यात पावसाचा अंदाज...

Share:
Main Image
Last updated: 17-Mar-2026

पुणे, (प्रतिनिधी) १७ मार्च - राज्यात येत्या पाच दिवसांत हवामानात मोठे बदल होणार असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून, काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी हा अंदाज वर्तवला आहे.

पाच दिवस 'असे' असेल हवामान
आज १६ मार्चपासून ते शुक्रवार २० मार्चपर्यंत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दुपारनंतर उष्णता संवहनी प्रक्रियेतून (Convective Rainfall) विजा, वारा आणि गडगडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

 

17 मार्च रोजी वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता राज्यातील दक्षिण भागांमध्ये राहील. यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांचा समावेश असून प्रामुख्याने तेलंगणा आणि कर्नाटक सीमेजवळील भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते. 21 मार्चपासून राज्यातील हवामान स्थिर होण्याचे संकेत आहेत.

Advertisement

रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. तसेच बाजार समित्यांमध्ये आणलेले धान्य व इतर कृषीमाल पावसापासून सुरक्षित राहील यासाठी त्यावर ताडपत्री किंवा अन्य संरक्षणात्मक आच्छादन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

२० जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक
१८ ते २० मार्च (बुधवार ते शुक्रवार) या कालावधीत, म्हणजेच गुढीपाडव्याच्या आसपास खालील जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल:
विदर्भ: अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ.
मराठवाडा: नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूर.
मध्य महाराष्ट्र: अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर.

गारपिटीचा इशारा (बुधवार, १८ मार्च)
बुधवारी विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये किरकोळ गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी बांधवांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उष्णतेची लाट आणि उकाडा
एकीकडे पावसाचे वातावरण असताना दुसरीकडे मुंबईसह उत्तर कोकण (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी) आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर अशा १३ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आणि रात्रीचा उकाडा कायम राहणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.