सत्तासंघर्षात मनसेचा स्वबळाचा हुंकार? राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

Share:
Main Image
Last updated: 08-Mar-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) ८ मार्च - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या, ९ मार्च रोजी २० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तमाम महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहून थेट संवाद साधला असून, उद्या सकाळी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ते पक्षाच्या महा-सदस्य नोंदणी अभियानाचा श्रीगणेशा करणार आहेत. विशेष म्हणजे, १० मार्चपासून राज्यभर घराघरांत पोहोचण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले असून, १९ मार्चच्या गुढीपाडवा मेळाव्यात शक्तीप्रदर्शनाचे संकेत दिले आहेत.

रायगड ते शिवतीर्थ: मनसेचा नवा 'रोडमॅप'
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "रायगड हा केवळ महाराजांच्या वास्तव्याचाच नव्हे, तर 'शिवराज्याभिषेकाचा' साक्षीदार आहे. अशा पावन ठिकाणी नतमस्तक होऊन मी स्वतःपासून सदस्य नोंदणीला सुरुवात करणार आहे." पक्षाच्या २० व्या वर्षात पदार्पण करताना राज ठाकरेंनी केवळ आकड्यांचे राजकारण न करता, लोकांच्या मनातील संताप नोंदणीच्या माध्यमातून व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

'डिजिटल' आणि 'ग्राऊंड'वरही आक्रमक पवित्रा
१० मार्चपासून सुरू होणारी ही सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपातही असणार आहे. मात्र, केवळ शाखांपुरते मर्यादित न राहता बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, मंदिरे आणि बागा अशा गजबजलेल्या ठिकाणी स्टॉल्स लावून जनतेशी संवाद साधण्याचे निर्देश राज यांनी दिले आहेत. "प्रश्न केवळ आकड्यांचा नाही, तर सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल जनतेच्या मनात असलेला राग या नोंदणीतून स्पष्ट होईल," असा टोला त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

गुढीपाडव्याला शिवतीर्थावर 'महाराष्ट्र दर्शन'
पत्राच्या शेवटी राज ठाकरे यांनी १९ मार्च रोजी दादरच्या शिवतीर्थावर होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे. "तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून याल, तेव्हा मला तुमच्या रूपात 'महाराष्ट्र दर्शन' घडेल," असे भावूक आवाहन त्यांनी केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची ही सदस्य नोंदणी मोहीम आणि पाडवा मेळावा राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे मांडणार का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.