महिलांसाठी विशेष भरोसा सेल आणि समुपदेशन केंद्र... असा होणार फायदा...

Share:
Main Image
Last updated: 08-Mar-2026

जळगाव, (प्रतिनिधी) ८ मार्च - महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक वाद आणि पीडितांना तातडीची मदत मिळवून देण्यात भरोसा सेल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या केंद्रासाठी स्वतंत्र व आधुनिक इमारत उभारल्यामुळे नागरिकांना अधिक सक्षम, संवेदनशील आणि सुसज्ज सेवा देणे शक्य होईल. महिलांना न्याय आणि आधार देण्यासाठी प्रशासन नेहमीच तत्पर असून महिलांच्या न्यायासाठी ‘भरोसा’चा नेहमीच आधार राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक वाद आणि संकटात सापडलेल्या महिला-बालकांना तातडीची मदत व समुपदेशन मिळावे या उद्देशाने जळगाव शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले त्याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.

Advertisement

या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सा.बा.चे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, यांच्यासह जळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी-कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली उभारण्यात येणारे हे केंद्र पीडित महिला व बालकांना कायदेशीर मदत, समुपदेशन आणि पोलीस सहाय्य एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक केंद्र ठरणार असून, जिल्ह्यातील सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी केले.

Advertisement

Comments

No comments yet.