मध्य पूर्वेतील युद्धाचा हवाई वाहतुकीला तडाखा... अडकलेल्या भारतीयांसाठी धावणार एवढी विशेष विमाने...

Share:
Main Image
Last updated: 03-Mar-2026

नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) ३ मार्च - मध्य पूर्वेतील बिघडत चाललेली युद्धजन्य परिस्थिती आणि हवाई क्षेत्रातील निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अडकलेल्या भारतीय प्रवाशांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. ३ मार्च २०२६ रोजी इंडिगो विमान कंपनी जेद्दाह येथून भारतात १० विशेष मदत उड्डाणे (Special Relief Flights) चालवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मंत्रालयाची हायव्होल्टेज बैठक
नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सचिव समीर कुमार सिन्हा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरक्षित उड्डाण संचालन, सेवांचे पुनर्संचालन आणि प्रभावित प्रवाशांची सोय यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्रालय सध्या परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासांशी सतत समन्वयात आहे.

पर्यायी मार्गांचा अवलंब
युद्धग्रस्त भागातील हवाई क्षेत्र टाळण्यासाठी भारतीय विमान कंपन्यांनी आपल्या वेळापत्रकात मोठे बदल केले आहेत:
लांब पल्ल्याची उड्डाणे: निर्बंधित हवाई क्षेत्र टाळून पर्यायी मार्गांद्वारे ही उड्डाणे टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केली जात आहेत.
विमान आणि कर्मचारी नियुक्ती: परिचालन स्थैर्य आणण्यासाठी विमान आणि कर्मचाऱ्यांच्या 'रिपोझिशनिंग'साठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.
परदेशी कंपन्यांवर परिणाम: भारत आणि आखाती देशांदरम्यान सेवा देणाऱ्या परदेशी विमान कंपन्यांनीही सध्या आपली उड्डाणे मर्यादित ठेवली आहेत.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून विमान कंपन्यांना खालील आदेश दिले आहेत:
१. प्रवाशांशी पारदर्शक संवाद ठेवावा आणि त्यांना परतावा (Refund) किंवा तिकीट पुनर्निर्धारणात मदत करावी.
२. विमानतळावर जाण्यापूर्वी: प्रवाशांनी आपल्या संबंधित विमान कंपनीकडून उड्डाणाची ताजी स्थिती तपासूनच घराबाहेर पडावे.
३. अधिकृत माहिती: अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहावे.

इंडिगोची विशेष मोहीम
जेद्दाह येथे अडकलेल्या भारतीयांसाठी इंडिगोने पुढाकार घेतला आहे. जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाशी समन्वय साधून ३ मार्च रोजी १० विशेष विमाने भारतात येतील. या मोहिमेमुळे शेकडो भारतीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

"आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांची सुव्यवस्थित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहेत."
— राममोहन नायडू, नागरी विमान वाहतूक मंत्री

Advertisement

Comments

No comments yet.