नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३ मार्च - पश्चिम आशियातील बिघडत चाललेली परिस्थिती आणि वाढता हिंसाचार या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहारिन, जॉर्डन आणि सौदी अरेबियाच्या राष्ट्रप्रमुखांशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. या संवादादरम्यान पंतप्रधानांनी या देशांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध करत शांतता प्रस्थापित करण्यावर भर दिला. तसेच, तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल संबंधित नेत्यांचे आभार मानले.
बहारिन: हल्ल्यांचा निषेध आणि एकजूट
पंतप्रधानांनी बहारिनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांच्याशी संवाद साधताना बहारिनवर झालेल्या अलीकडील हल्ल्यांचा कडक शब्दांत निषेध केला. "या कठीण प्रसंगी भारत बहारिनच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे," अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच बहारिनमधील भारतीय नागरिकांना मिळणाऱ्या मदतीबद्दल त्यांनी राजांचे विशेष आभार मानले.
जॉर्डन: शांतता आणि सुरक्षिततेसाठी पाठिंबा
जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी चर्चा करताना मोदींनी प्रदेशातील बदलत्या आणि चिंताजनक परिस्थितीवर चर्चा केली. जॉर्डनमधील जनतेचे कल्याण, शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी भारताचा पाठिंबा कायम राहील, अशी पुनःपुष्टी पंतप्रधानांनी केली. जॉर्डनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांची या युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सौदी अरेबिया: सार्वभौमत्वाचे उल्लंघन खपवून घेणार नाही
सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी झालेल्या चर्चेत पश्चिम आशियातील घडामोडींवर सखोल मंथन झाले. सौदीवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, हे हल्ले म्हणजे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन आहे.
"पश्चिम आशियात लवकरात लवकर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होणे ही काळाची गरज असून, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले," असे पंतप्रधानांनी त्यांच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) संदेशात नमूद केले.
भारतीय समुदायाची सुरक्षा केंद्रस्थानी
या तिन्ही नेत्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी तिथे राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले. संकटकाळात भारतीय समुदायाला मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी तिन्ही राष्ट्रप्रमुखांचे आभार मानले. भारताचे या देशांशी असलेले धोरणात्मक संबंध आणि या प्रदेशातील शांततेसाठी भारताची सक्रिय भूमिका या चर्चेतून अधोरेखित झाली आहे.