नाशिक, (प्रतिनिधी) २ मार्च - शहरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना लक्ष करून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. मुंबई नाका आणि अशोकस्तंभ भागात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वृद्ध महिलांचे सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने भामट्या महिलांनी हातोहात लांबवले आहेत. याप्रकरणी मुंबई नाका आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना: सहप्रवासी महिलांनी लांबवले मंगळसूत्र
गोविंदनगर येथील रहिवासी मंगला सुधाकर मेतकर या शनिवारी (दि. २८) दुपारी कालिका मंदिर येथे देवदर्शनासाठी रिक्षाने जात होत्या. गोविंदनगर ते मुंबई नाका दरम्यान रिक्षात तीन महिला व एक मुलगी सहप्रवासी म्हणून बसल्या होत्या. या भामट्या महिलांनी गर्दीचा फायदा घेत मेतकर यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत १ लाख रुपये) अत्यंत शिताफीने चोरून नेले. कालिका मंदिर परिसरात उतरल्यानंतर मेतकर यांच्या ही बाब लक्षात आली, मात्र तोपर्यंत रिक्षा निघून गेली होती. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून हवालदार खान तपास करत आहेत.
दुसरी घटना: मुंबईच्या महिलेची सोन्याची पोत चोरीला
दुसऱ्या घटनेत, नातेवाईकांना भेटण्यासाठी मुंबईहून (चेंबूर) आलेल्या शालिनी सुभाष सोनार या वृद्ध महिलेला लुटण्यात आले. गुरुवारी (दि. २६) सकाळी त्या आरटीओ कॉर्नर ते अशोकस्तंभ असा रिक्षाने प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्या पिशवीत ठेवलेली अडीच तोळे वजनाची सोन्याची पट्टा पोत आणि ५०० रुपयांची रोकड (एकूण ७५,५०० रुपये) एका अनोळखी सहप्रवासी महिलेने शिताफीने चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार मुर्तरकर अधिक तपास करत आहेत.
नागरिकांसाठी आवाहन
रिक्षातून प्रवास करताना सहप्रवासी महिलांकडे लक्ष ठेवावे. आपली बॅग किंवा दागिने सुरक्षित असल्याची खात्री वेळोवेळी करावी. संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नाशिक : पंचवटीतील शिवाजी चौकात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे एक लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ६० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश राजेंद्र दरेकर (रा.नाथगल्ली शिवाजी चौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दरेकर कुटूंबिय रविवारी (दि.१) सकाळी नेहमी प्रमाणे कामावर गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात शिरलेल्या भामट्यंनी कपाटात ठेवलेली ६० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख तीन हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत.