नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २ मार्च - मध्यपूर्वेतील इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून त्याचे गंभीर परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत इराणने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर सोमवारी, २ मार्च रोजी जागतिक बाजारपेठ उघडताच कच्च्या तेलाच्या किमतीत १३ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ नोंदवण्यात आली. हे गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठे 'ऑइल संकट' मानले जात असून, कच्च्या तेलाचे दर लवकरच १०० डॉलरचा टप्पा पार करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
युद्धाचा विळखा आणि विस्कळीत पुरवठा
इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी दुबई, अबू धाबी, कतार आणि सौदी अरेबिया यांसारख्या तेल उत्पादक देशांच्या क्षेत्रांना लक्ष्य केल्याने खळबळ माजली आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती १२ टक्क्यांनी वधारून ८० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. विशेष म्हणजे, जून २०२५ नंतर पहिल्यांदाच तेलाने हा स्तर गाठला आहे. दुसरीकडे, यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूडचा दरही ७० डॉलरवर गेला आहे.
का वाढले गुंतवणूकदारांचे टेन्शन?
१. होर्मुझची सामुद्रधुनी धोक्यात: जगातील एकूण तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. इराणने हा मार्ग बंद केल्यास जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडू शकते.
२. इराणची भूमिका: इराण हा OPEC+ गटातील एक प्रमुख उत्पादक देश आहे. इराणमधील अस्थिरतेचा अर्थ जगाला मिळणाऱ्या लाखो बॅरल तेलात कपात होणे असा आहे.
३. उत्पादन वाढीचा निर्णय: परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी OPEC+ देशांनी एप्रिलपासून तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी, युद्धाच्या भीतीमुळे बाजार सावरणे कठीण होत आहे.
भारतावर काय परिणाम होणार?
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली ही मोठी वाढ भारतासाठी चिंताजनक आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वधारल्याने सरकारी तेल कंपन्यांवर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यासाठी दबाव वाढणार आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडण्याची चिन्हे आहेत.
तज्ज्ञांचे मत: जर मध्यपूर्वेतील हा तणाव निवळला नाही, तर येत्या काही आठवड्यांत कच्च्या तेलाचा दर १०० ते ११० डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतो. यामुळे जागतिक स्तरावर महागाईचा नवा भडका उडू शकतो.