नाशिक, (प्रतिनिधी) १९ एप्रिल - दैवी चमत्काराच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापाचा घडा भरला असून, त्याचा तुरुंगातील मुक्काम अधिकच लांबला आहे. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर, न्यायालयाने खरातला २३ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शारीरिक व्याधींचे कारण पुढे करत खरातच्या वकिलांनी त्याला न्यूरोसर्जनकडे नेण्याची मागणी न्यायालयात केली.
व्हीसीद्वारे हजेरी आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद
सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडीची मागणी करताना महत्त्वाचे मुद्दे मांडले. "आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत (Modus Operandi) एक असली तरी प्रत्येक पीडित महिला वेगळी आहे. महिलांना गुंगीचे पदार्थ पाजून आणि त्यांची फसवणूक करून त्याने अत्याचार केले आहेत. या गुन्ह्यात वापरलेली द्रव्ये कोठून आणली आणि यामागे काही मोठे षडयंत्र आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी मिळणे आवश्यक आहे," असा जोरदार युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
'नराधम' आजारी असल्याचा वकिलांचा दावा
अशोक खरातच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. "आरोपीच्या खांद्याचे ऑपरेशन झाले असून त्याचे डोकेही सतत दुखत आहे. साध्या पेनकिलर औषधांनी त्याला फरक पडत नाही, त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीवेळी तज्ज्ञ न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे," अशी विनंती वकिलांनी केली. यावर न्यायालयाने पोलिसांना आरोपीला आवश्यक ते औषधोपचार पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य पाहून कोठडीची मागणी मान्य केली.
SIT कडून प्रत्येक गुन्ह्याचा कसून तपास
अशोक खरात विरोधात तक्रार देण्यासाठी अनेक महिला आता धैर्याने पुढे येत आहेत. एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली की, एसआयटी तातडीने दुसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेत आहे. फसवणूक, अत्याचार आणि अमली पदार्थांचा वापर या सर्व अंगांनी पोलीस खरातची दररोज कसून चौकशी करत आहेत. २३ एप्रिलपर्यंत तो पोलीस कोठडीत राहणार असल्याने या काळात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.