मुंबई, (प्रतिनिधी) २८ फेब्रुवारी - राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाला एक महिना पूर्ण होत असतानाच, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक चौकशी अहवाल प्रसिद्ध केला आहे. २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना झालेल्या या अपघाताबाबत अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
काय आहे प्राथमिक अहवालात?
अहवालानुसार, २८ जानेवारी रोजी सकाळी ८:४६ वाजता दाट धुक्यामुळे 'लिअरजेट ४५ एक्सआर' (VT-SSK) विमानाचे लँडिंग करणे कठीण झाले होते. लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नादरम्यान, विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी एका झाडाला धडकले होते. अपघाताच्या वेळी परिसरात दृश्यमानता केवळ २,००० मीटर इतकी होती.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) प्रचंड उष्णतेमुळे खराब झाला आहे. त्यामुळे त्यातील डेटा मिळवण्यात अडचणी येत आहेत. मात्र, उपलब्ध यंत्रणांतून 'रॉ डेटा' डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सध्या सुरू आहे.
अमेरिकन कंपन्यांची मदत घेणार
विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) मधील सुरक्षित माहिती बाहेर काढण्यासाठी आता अमेरिकन तज्ज्ञांची टीम भारतात येणार आहे. ज्या कंपनीने हा ब्लॅक बॉक्स तयार केला आहे, त्या कंपनीच्या मदतीने डेटा रिकव्हर केला जाईल. या माहितीमुळे अपघाताच्या शेवटच्या क्षणी नक्की काय घडले, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.
अंतिम अहवाल येण्यास अद्याप काही अवधी लागणार असून, अमेरिकन टीमच्या तपासणीनंतरच अपघाताचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल.