कांदा उत्पादकांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन होत असल्याने छगन भुजबळ अस्वस्थ... मुख्यमंत्री फडणवीस यांना म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 28-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २८ फेब्रुवारी - कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत असून नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अतिशय चिंतेत आहे. कांद्याच्या प्रश्नांवर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत असून कांद्याच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक कांदा उत्पादन करणारा जिल्हा असून येथील हजारो शेतकरी कांदा पिकावर आपला उदरनिर्वाह अवलंबून आहे.कांदा दरातील चढ-उताराचा थेट परिणाम नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांवर होत असतो. राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत. जानेवारी महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव प्रतिक्विंटल सुमारे १,००० रुपयांच्या आसपास स्थिरावले होते. आता तर त्यापेक्षाही कमी दर मिळत आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अत्यंत अपुरा व तोट्याचा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे कांद्याच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.