मुलींसाठी सुवर्णसंधी... मोफत पोलीस - सैन्यदल भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण...

Share:
Main Image
Last updated: 28-Feb-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) २८ फेब्रुवारी - जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींसाठी दि. १ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत चार महिन्यांच्या मोफत निवासी व भोजन व्यवस्थेसह असणाऱ्या या भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन 'पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी, ता. अकोले' येथे करण्यात आले आहे. इच्छुकांनी २६ मार्च २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे.

प्रशिक्षणासाठी उमेदवार किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे. वजन किमान ४५ कि.ग्रॅ. तसेच उंची किमान १५५ से.मी. असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये इ. १२ वीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला किंवा शिधापत्रिका, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) तसेच चार पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सादर करणे बंधनकारक आहे.

निवड प्रक्रिया शारीरिक क्षमता चाचणी व लेखी परीक्षेद्वारे होणार असून ८०० मीटर धावण्याची चाचणी (५० गुण) व लेखी परीक्षा (५० गुण) अशा एकूण १०० गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. उमेदवारांची निवड गुणवत्ता क्रमांकानुसार करण्यात येणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक ६ मार्च २०२६ ते २६ मार्च २०२६ या कालावधीत ऑफलाईन अर्ज भरून पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज केलेल्या उमेदवारांनी दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता मूळ कागदपत्रांसह आणि त्यांच्या छायांकित प्रतींसह परीक्षेसाठी प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९४२१५२५४१६, ८२७५३४९४१४ किंवा ८८०५६९८९४५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.