फक्त हे करा आणि २१ लाख मिळवा... कोण आव्हान स्वीकारणार?

Share:
Main Image
Last updated: 27-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ फेब्रुवारी - शिक्षणाचा प्रसार होऊनही समाजात अंधश्रद्धांचे प्रमाण आणि त्यातून होणारे शोषण थांबलेले नाही. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा बनाव करून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबांना आता 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने (अंनिस) पुन्हा एकदा खुले आव्हान दिले आहे. "कुणीही आपले चमत्कार विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करून दाखवल्यास त्यांना २१ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल," असे जाहीर पत्रक अंनिसने प्रसिद्ध केले आहे.

शिक्षणांनंतरही अंधश्रद्धेचा विळखा कायम
अंनिसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिक्षणामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजेल आणि अंधश्रद्धा कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, आजही तंत्र-मंत्र आणि दैवी तोडग्यांच्या नावाखाली समाजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक शोषण होताना दिसत आहे. अनेक भोंदूबुवा विज्ञानायुगातही चमत्कारांचे दावे करून सामान्यांना भुरळ घालत आहेत.

३७ वर्षांपासून लढा सुरू
महाराष्ट्र अंनिस गेल्या ३७ वर्षांपासून या अघोरी आणि अमानुष प्रथांविरुद्ध संघटित लढा देत आहे. समाजात जनजागृती करण्यात संघटनेला मोठ्या प्रमाणावर यश आले असले, तरी अध्यात्माच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरी अद्याप पूर्णपणे थांबलेली नाही. या पार्श्वभूमीवर, चमत्काराचा दावा करणाऱ्यांनी समोर यावे आणि संघटनेच्या नियम व अटींच्या अधीन राहून आपले दावे सिद्ध करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
केवळ आव्हानच नाही, तर जनतेलाही अंनिसने मोलाचा सल्ला दिला आहे. "नागरिकांनी कोणत्याही तथाकथित चमत्कारांना बळी पडू नये. जर कुठे अशा प्रकारे भोंदूगिरी किंवा शोषण होत असल्याचे आढळल्यास, तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा किंवा अंनिसच्या कार्यकर्त्यांना कळवावे," असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.
या पत्रकावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे आणि राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.