पुणे-नाशिक रेल्वे नक्की कुठल्या मार्गे होणार? मुख्यमंत्री फडणवीस विधिमंडळात म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 26-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २६ फेब्रुवारी -  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. हा रेल्वेमार्ग वळसा न घेता सरळ मार्गानेच व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या तज्ज्ञ सल्लागारांची समिती नेमून पुढील ३ ते ४ महिन्यांत अभ्यास अहवाल सादर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिले. आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

काय आहे नेमका वाद?
पुणे-नाशिक रेल्वेमार्ग नाशिक-सिन्नर-संगमनेर-अकोले-नारायणगाव-मंचर-चाकण या मूळ नियोजित सरळ मार्गाने जावा, अशी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची ठाम मागणी आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातिल खोडद येथील GMRT (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) या आंतरराष्ट्रीय वेधशाळेच्या 'बफर झोन'मुळे तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगत केंद्र सरकारने हा मार्ग वळवण्याचे संकेत दिले होते. या वळसामुळे रेल्वेचा प्रवास लांबणार असून विकासापासून अनेक तालुके वंचित राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

'GMRT'चे कारण की केवळ संभ्रम?
आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात हा प्रश्न आक्रमकपणे मांडला. ते म्हणाले, "GMRT संस्थेने अद्याप कोणतीही अधिकृत तांत्रिक हरकत नोंदवलेली नाही किंवा याची अधिकृत पडताळणी झालेली नाही. मग तरीही केंद्र सरकारकडून हे कारण पुढे का केले जात आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, हा प्रकल्प सरळ मार्गाने होणे हीच दिवंगत नेते अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्र्यांची भूमिका
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, केंद्राने वेधशाळेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे कळवले आहे. मात्र, जनभावना लक्षात घेता:
केंद्रातील तज्ज्ञ सल्लागारांची समिती नेमली जाईल.
हा मार्ग मूळ सरळ मार्गाच्या शक्य तितक्या जवळून कसा नेता येईल, याचा तांत्रिक शोध घेतला जाईल.
३ ते ४ महिन्यांत याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लढ्याचा कालपट (Timelines):
हा मार्ग मार्गी लावण्यासाठी आ. सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे:
फेब्रुवारी २०२४: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट.
जुलै २०२४: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा.
डिसेंबर २०२५: हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित.
मार्च २०२५: सर्वपक्षीय कृती समितीची बैठक.

"पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गाने व्हावी यासाठी गावोगावी कृती समित्या आणि आंदोलने सुरू आहेत. जनतेचा हा लढा तडीस नेईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील."
— सत्यजित तांबे, आमदार (विधान परिषद)

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.