मुंबई, (प्रतिनिधी) २५ फेब्रुवारी - 'झी मराठी'वरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारा निवेदक-अभिनेता डॉ. निलेश साबळे पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. गेल्या काही काळापासून पडद्यामागे असलेल्या निलेशने सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर केली असून, त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे निलेशची पोस्ट?
निलेश साबळेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो लाल रंगाच्या सूटमध्ये, डोळ्यावर चष्मा लावून एका खुर्चीवर विचारमग्न अवस्थेत बसलेला दिसत आहे. या फोटोला त्याने अतिशय खास कॅप्शन दिले आहे. निलेशने लिहिले, "नवा दिवस… नवा विचार… चला… काहीतरी नवीन करूया…!!!" त्याच्या या एका वाक्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस
निलेशच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "तुमच्या नव्या कार्यक्रमाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत", "काहीतरी धमाकेदार घेऊन या", "आम्हाला पुन्हा एकदा निखळ मनोरंजनाची गरज आहे", अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. १० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाने निरोप घेतला होता. त्यानंतर कलर्स मराठीवरील त्याच्या 'हसताय ना... हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र, आता निलेश नक्की काय नवीन घेऊन येतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुन्हा एकदा भाऊ कदमसोबत दिसणार?
काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील एका पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी केले होते. त्यावेळी निलेशने "आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार आहोत," असे संकेत दिले होते. त्यामुळे त्याचा हा नवा प्रोजेक्ट झी मराठीवर असेल की अन्य कोणत्या प्लॅटफॉर्मवर, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
सध्या तरी निलेशच्या या "काहीतरी नवीन करूया" या सादेला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, लवकरच या नव्या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
?igsh=MXZ0c3V4dGM2N2ZjZA==