नियम मोडणाऱ्या ऑर्केस्ट्रा-बार विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 25-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २५ फेब्रुवारी - राज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्या आणि वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध राज्य शासन आता कठोर पवित्रा घेणार आहे. अशा प्रकरणांत तीन वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
आमदार सुभाष देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासात ऑर्केस्ट्रा व डान्सबारवरील कारवाईबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

'डान्सबार' प्रवृत्तीला चाप बसणार
मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या आड डान्सबार चालवले जातात. पोलिसांकडून कारवाई होऊनही काही दिवसांनी पुन्हा त्याच प्रकारे बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला जातो. या पुनरावृत्तीला आळा घालण्यासाठी शासनाने कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिवेशनात किंवा आगामी अधिवेशनात यासंदर्भातील दुरुस्ती प्रस्तावित केली जाईल, ज्यामुळे नियमभंग करणाऱ्यांचे परवाने कायमचे बाद होतील.

अटी आणि शर्थींचे पालन अनिवार्य
सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर वेळोवेळी दिलेल्या निर्णयांचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, "राज्य शासनाने यापूर्वी केलेले काही कायदे न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले होते. मात्र, शासनाने आता नव्याने नियम आखले आहेत. ऑर्केस्ट्रा बारसाठी विशिष्ट जागा, पार्टीशन (कप्पे) आणि मद्य विक्रीबाबतच्या कडक अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन करणे प्रत्येक बार मालकाला बंधनकारक असेल."

पनवेल प्रकरणाची चौकशी
चर्चेदरम्यान पनवेल येथील एका प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला असता, त्या प्रकरणाची सखोल तपासणी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या चर्चेत आमदार भास्कर जाधव यांनी देखील सहभाग घेऊन काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.

"केवळ कारवाई करून चालणार नाही, तर नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना जरब बसली पाहिजे. म्हणूनच तीन वेळा नियम मोडल्यास परवाना रद्द करण्याची तरतूद आम्ही करत आहोत."
— देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.