नाशिक, (प्रतिनिधी) २४ फेब्रुवारी - चीन आणि पाकिस्तानने भारतीय सीमेलगत कुठेल्याही छुप्या हालचाली केल्या किंवा बांधकामे केली, तरी आपल्या नजरेने ती अचूक टिपणारे आणि उपग्रह छायाचित्र विश्लेषणात जागतिक ख्याती असलेले कर्नल विनायक भट पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत. लष्करी गुप्तहेर खात्यातून सेवानिवृत्त झालेले कर्नल भट हे चिनी भाषा तज्ज्ञ असून त्यांना भेटण्याची व त्यांचे विचार ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.
कर्नल भट हे भारतीय लष्करातील ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी 'ओपन सोर्स इंटेलिजन्स' मध्ये जागतिक स्तरावर स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. उपग्रह छायाचित्रांच्या आधारे चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील हालचालींचे ते अचूक विश्लेषण करतात. डोकलाम, पँगाँग त्सो आणि अक्साई चीनमधील चिनी घुसखोरी त्यांनी पुराव्यासहित जगासमोर आणली आहे. चिनी भाषा तज्ज्ञ असलेले कर्नल भट हे भारत-चीनच्य शिष्टमंडळातील वाटाघाटींवेळी दुभाषी म्हणूनही जबाबदारी सांभाळतात. भारत-चीन सीमा प्रश्नाचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. चीनची धोरणे आणि रणनीतीचे त्यांना सखोल ज्ञान आहे.
उल्लेखनीय सेवेबद्दल दोन वेळा गौरव
कर्नल भट हे लष्करी सेवेत असताना उत्कृष्ट ट्रेकर होते. त्यांनी नन आणि स्टोक कांगडी सारख्या शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. उल्लेखनीय सेवेबद्दल कर्नल भट यांना दोन वेळा 'Chief of Army Staff Commendation Card' देऊन गौरविण्यात आले आहे.
खळबळजनक माहिती उजेडात
कर्नल विनायक भट हे केवळ एक माजी लष्करी अधिकारी नसून ते आधुनिक काळातील अशा 'डिजिटल' योद्ध्यांपैकी एक आहेत, जे कॉम्प्युटर समोर बसून शत्रूच्या सीमांवरील छुप्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतात. कर्नल भट यांच्या एका ट्विटमुळे शत्रूच्या गोटात खळबळ माजते आणि भारत सरकारलाही दखल घ्यावी लागते. भारतीय सीमेवरील अतिशय खळबळजनक माहिती त्यांच्यामुळे उजेडात येते आणि भारत सरकार अक्षरशः कामाला लागते.
कर्नल भट यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन
मुक्त पत्रकार, लेखक आणि सुपरफास्ट नाशिकचे संपादक भावेश ब्राह्मणकर लिखित आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानची अभ्यासवृत्ती प्राप्त ‘अरूणोदय’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. मराठी भाषा गौरव दिन आणि साहित्यसम्राट कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुल येथील कुर्तकोटी सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा सर्वांसाठी खुला असून, नाशिककर साहित्य रसिकांनी आणि संरक्षण विषयातील अभ्यासकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.