उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मंत्री छगन भुजबळ भावनिक... म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 23-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २३ फेब्रुवारी - दादांच्या कामाची शिस्त, वक्तशीरपणा आणि सामान्यांच्या प्रश्नांची जाण हा सर्वांसाठी एक वस्तुपाठ होता. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘आधारवड’ आज उन्मळून पडला आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शोक भावना व्यक्त केल्या.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इतर दिवंगत व्यक्तींचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. या शोकप्रस्तावावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आज महाराष्ट्र विधानसभेत राज्याचे लाडके ‘दादा’ अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मन अतिशय हेलावून गेले आहे. १९८५ पासून आजवर अनेक दिग्गजांना निरोप दिला, पण दादांसाठी शोकप्रस्ताव मांडावा लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेबांच्या पाऊलावर पाउल ठेऊन राजकारणात आपला वेगळा ठसा अजितदादा पवार यांनी निर्माण केला होता. आपल्या कामात ते अतिशय तत्पर असायचे. विरोधकांचे देखील कामे ते प्राधान्याने करत होते. हे अजितदादा आपल्यात नाही अद्याप यावर विश्वासच बसत नाही. दादांचा वावर आजही आपल्यात आहे असेच नेहमी वाटते. त्यांच्या जाण्याने आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘आधारवड’ आज उन्मळून पडला असून कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याच्या शोकभावना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केल्या.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.