मुंबई, (प्रतिनिधी) २३ फेब्रुवारी - "कार्यमग्नता ख्याती व्हावी, मृत्यू हीच विश्रांती... हे संतवचन अजितदादांना तंतोतंत लागू पडते. सकाळी ६ वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारा असा शिस्तबद्ध नेता पुन्हा होणे नाही," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव मांडताना फडणवीस यांनी अजितदादांसोबतच्या शेवटच्या भेटीचा हृदयस्पर्शी आठवण सांगितली.
तो पाऊण तास आणि शेवटची भेट
अजित पवार यांच्या निधनापूर्वीच्या भेटीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, २७ जानेवारी २०२६ रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर पायाभूत सुविधांच्या एका महत्त्वाच्या बैठकीत दादांनी आपल्या खास शैलीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. बैठकीनंतर आम्ही दोघे 'अँटी चेंबर'मध्ये (दालन) एकत्र बसलो होतो. तिथे आमची सुमारे पाऊण तास चर्चा झाली. त्या दिवशी दादा खूप भरभरून बोलले. जणू काही त्यांना खूप काही सांगायचे होते. "त्यावेळी ते इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारत होते, की ती आमची शेवटची भेट ठरेल याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती," असे सांगताना मुख्यमंत्र्यांचा आवाज गहिवरला.
१२ व्या अर्थसंकल्पाची हुकलेली संधी
अजित पवार यांची प्रशासकीय पकड आणि अर्थसंकल्पावरील अभ्यासाचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, यंदाच्या अधिवेशनात दादा आपला १२ वा अर्थसंकल्प मांडणार होते. तर पुढील वर्षी १३ वा अर्थसंकल्प सादर करून त्यांनी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचा सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोडीत काढला असता. मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि महाराष्ट्राने एक कर्तबगार नेतृत्व गमावले.
भावनिक नाते आणि समान वाढदिवस
"माझा आणि दादांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २२ जुलैला असतो. ते माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे होते. २०१४ नंतर आमच्यात राजकीय पलीकडे जाऊन एक भावनिक नाते तयार झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर होताच, पण वैयक्तिकरित्या दादांचे माझ्यावर मोठे प्रेम होते," अशा आठवणींना फडणवीस यांनी उजाळा दिला.
विमान अपघातात झालेल्या अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. विधिमंडळाच्या या अधिवेशनात त्यांच्या अनुपस्थितीची मोठी उणीव भासत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
?s=20