गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी... जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले हे निर्देश...

Share:
Main Image
Last updated: 21-Feb-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) २१ फेब्रुवारी - गॅस सिलिंडरची नोंदणी आणि वितरणाबाबत ग्राहकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. "वितरकांनी ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून त्यांना वेळेत सिलिंडर उपलब्ध करून द्यावे. ग्राहकांशी सौजन्याने वागावे आणि गॅस वितरण केंद्रांवर तक्रार क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करावेत," असे स्पष्ट निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत गॅस वितरणासह वीज, स्वच्छता आणि भेसळ रोखण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

१९०६ या हेल्पलाईनवर करा संपर्क
गॅस वितरणाबाबत नागरिकांना काहीही तक्रार असल्यास त्यांनी १९०६ या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही बढे यांनी यावेळी केले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि निर्देश:
विद्युत विभाग: नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळेल याची दक्षता घ्यावी. प्रलंबित तक्रारींचा निपटारा तातडीने करावा.
महानगरपालिका प्रशासन: शहरात स्वच्छतेबाबतच्या तक्रारींची दखल घ्यावी. वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटावे, पार्किंगचे योग्य नियोजन करावे आणि भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा.
कृषी आणि अन्न विभाग: खतांची सक्तीने लिंकिंग (खत खरेदी करताना इतर उत्पादने गळ्यात मारणे) करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रशासकीय पारदर्शकता: शासकीय विभागांत येणारे तक्रार अर्ज तातडीने स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.

अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त मेहेर लहारे, सहाय्यक पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच, अशासकीय सदस्य विलास जगदाळे, प्रा. अमिता रानू-कोहली, अशोक शेवाळे, डॉ. राजेंद्र कळमकर, डॉ. विलास सोनवणे व प्रकाश रासकर यांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवत जनसामान्यांचे प्रश्न मांडले.

Advertisement

Comments

No comments yet.