मंत्रालयातील लाच प्रकरणी झिरवाळ ॲक्शन मोडवर.... याची केली हकालपट्टी...

Share:
Main Image
Last updated: 20-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २० फेब्रुवारी - अन्न व औषध प्रशासन विभागाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कथित लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने पावले उचलली असून, आपले खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त केले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मंत्रालयातील या लाचखोरीचा पर्दाफाश एका स्टिंग ऑपरेशनद्वारे झाला आहे. औषध विक्रेते निर्मल शर्मा यांच्या मेडिकल स्टोअरचा परवाना निलंबित करण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी मंत्रालयात अपील दाखल केले होते. या कामासाठी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लाच घेण्यासाठी फाईलवर विशिष्ट 'कोडवर्ड'चा वापर केला जात असल्याचा दावा स्टिंगमध्ये करण्यात आला आहे. फाईलवर पेनाने एक ओळ मारणे म्हणजे ५० हजार रुपये आणि दोन ओळी मारणे म्हणजे १ लाख रुपये, अशी ही खुणेची भाषा असल्याची माहिती समोर आली आहे.

खासगी सचिवावर कारवाई
या स्टिंग ऑपरेशनमध्ये डॉ. रामदास गाडे यांचे नाव चर्चेत आल्यानंतर झिरवाळ यांनी त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. डॉ. गाडे हे पशुसंवर्धन विभागात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत असून ते प्रतिनियुक्तीवर झिरवाळ यांच्याकडे खासगी सचिव म्हणून आले होते. त्यांना आता त्यांच्या मूळ विभागात (कृषी व पदुम विभाग) परत पाठवण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांचे कारनामे कॅमेऱ्यात कैद
स्टिंगनुसार, लिपिक राजेंद्र ढेरंगे यांनी १ लाख १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील १ लाख रुपये 'वरच्या साहेबांसाठी' आणि १० हजार स्वतःसाठी असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तडजोडीअंती ५५ हजार रुपये दिल्यानंतर कामाची खात्री देण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
तक्रारदार निर्मल शर्मा यांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मंत्र्यांच्या कार्यालयातच अशा प्रकारे 'कोडवर्ड' वापरून लाचखोरी होत असल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.