येवला, (प्रतिनिधी) १९ फेब्रुवारी - आपल्या देशात अनेक राजे होऊन गेले. मात्र राजा म्हटले तर सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज प्रथमतः डोळ्यासमोर येतात. समाजातील सर्व घटकाना सोबत घेऊन त्यांनी आपल्या सैन्यात त्यांना स्थान दिले होते. त्यामुळे स्वराज्यातील प्रत्येक घडामोडीची त्यांना माहिती असायची. कुणावरही अन्याय होणार नाही यासाठी त्यांचा प्रयत्न होता. त्यांचा हा लढा कुठल्याही समाजाविरुद्ध नाही तर अन्यायाविरुद्ध लढा होता असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त येवला येथील भव्य ‘शिवसृष्टी’ प्रकल्पात विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टी प्रकल्पातील नयनरम्य कारंजाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला माजी खासदार समीर भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते. येवल्याचे प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटोळे, पप्पू सस्कर,अरुणमामा थोरात, भोलशेठ लोणारी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम, प्रवक्ते राजेश भांडगे, सुरज पटणी नगरसेवक दिपक लोणारी, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक प्रविण बनकर, नगरसेवक पारुल गुजराथी, नगरसेवक नितीन काबरा, नगरसेविका छाया क्षिरसागर, नगरसेविका लक्ष्मीबाई जावळे, नगरसेवक बंटी परदेशी, संजय बनकर, महिला शहराध्यक्षा राजश्री पहिलवान, गुड्डू जावळे, मकरंद सोनवणे, भागवतराव सोनवणे, भागीनाथ पगारे, सचिन कळमकर, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, नवनाथ काळे, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, प्रवीण पहिलवान, देविदास निकम, समाधान जेजुरकर, भूषण लाघवे, सुमित थोरात, सचिन सोनवणे, दीपक गायकवाड, प्रा.संतोष राऊळ, वाल्मीक कुमावत, दीपक पवार, गणेश गवळी येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि येवलेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यात प्रत्येक घटकाची तितकीच काळजी घेतली. त्याचं सैन्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना स्थान होते. राज्यातील शेतकरी आणि महिलाना त्यांनी सन्मानाचे स्थान दिले होते. शेतकऱ्याचे कुठलेही नुकसान होऊ नये यासाठी ते काळजी घेत. महिलाना समाजात चांगली वागणूक मिळावी त्यांच्यावर कुठल्याही अन्याय होऊ नये याकडे त्यांचा कटाक्ष होता. म्हणूनच त्यांना रयतेचा राजा ही उपाधी मिळाली. आपल्या स्वराज्यातील प्रत्येक घटकाची तितकीच काळजी घेणारा आणि अन्यायाविरुद्ध लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासर्वांसाठी दैवतच असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शिवसृष्टी प्रकल्प हा येवला शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटन विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व विचारांचा परिचय व्हावा, तसेच स्वराज्याच्या इतिहासाची प्रेरणा समाजमनात जागृत राहावी, या उद्देशाने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. हा प्रकल्प इतिहास, प्रेरणा आणि संस्कारांचा संगम ठरत असून येथे सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, कारंजा, अत्याधुनिक संग्रहालय, वाचनालय तसेच शिवकालीन इतिहास आणि मावळ्यांच्या पराक्रमाची माहिती देणाऱ्या विविध शिल्परचना उभारण्यात आल्या आहेत. शिवसृष्टी ही केवळ वास्तू नसून स्वराज्याच्या प्रेरणेचे, इतिहास जतनाचे आणि भावी पिढीला संस्कार देणारे प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले.
‘शाहिरी शिवदर्शन’ सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘शाहिरी शिवदर्शन’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना इतिहासाच्या वैभवशाली काळात नेणारा अविस्मरणीय अनुभव दिला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या दमदार पोवाड्यांमधून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास, अद्वितीय शौर्य, रणनिती, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवला.
या सादरीकरणात शिवरायांच्या बालपणापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतच्या संघर्षमय प्रवासाचे, शत्रूंविरुद्ध लढलेल्या पराक्रमाचे, तसेच प्रजाहितदक्ष आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचे प्रभावी चित्रण करण्यात आले. पोवाड्यांच्या जोशपूर्ण शब्दरचना, ढोल-ताशांच्या गजरात सादर झालेले वीररसपूर्ण गायन आणि प्रभावी अभिनय यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमातून स्वराज्याच्या संकल्पनेमागील दूरदृष्टी, न्यायनिष्ठ प्रशासन, स्त्री सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याणाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. त्यामुळे उपस्थित युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि इतिहासाबद्दलची जागरूकता निर्माण झाली. या सांस्कृतिक सोहळ्याने केवळ मनोरंजन न करता सामाजिक व ऐतिहासिक जाणीवा दृढ करण्याचे कार्य केले.
“शिवसृष्टीच्या साक्षीने आठवणींचा महापूर; नागरिकांच्या डोळ्यांत दाटले अश्रू”
येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळ्याची चित्रफित कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडलेल्या त्या ऐतिहासिक क्षणांचा आढावा चित्रफितीतून उलगडताच उपस्थित नागरिकांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसृष्टी प्रकल्पाच्या उभारणीतील प्रवास, लोकार्पणावेळीचा उत्साह आणि ऐतिहासिक स्मृतींचे जतन करणारे दृश्य पाहताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या क्षणांनी शिवसृष्टीतील वातावरण भारावून गेले होते.
यावेळी उपस्थितांच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.