केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात येणार... देशातून ५ हजार कृषीप्रेमींचीही उपस्थिती...

Share:
Main Image
Last updated: 20-Feb-2026

जळगाव, (प्रतिनिधी) २० फेब्रुवारी - “भूमी स्वस्थ राहिली तर समाज स्वस्थ राहील” या भावनेतून तंत्रज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर मेळ साधत शेती - मातीसोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अक्षय कृषी परिवाराच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘भूमी सुपोषण एवं संरक्षण अभियानाचा’ शुभारंभ 19 मार्च रोजी अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर परिसरात देशाचे कृषी मंत्री तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे.*

या अभियानाच्या निमित्ताने शेती, माती आणि जीवन यावर परिवर्तनात्मक संवाद होणार असून हे अभियान एक व्यापक चळवळ बनावे, यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी गुरुवार दि. 19 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम विभाग क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर तसेच मंगळग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष दिगंबर महाले उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब चौधरी यांनी प्रस्ताविकातून अक्षय कृषी परिवारामार्फत देशभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर डॉ. गजानन डांगे यांचा परिचय करून देण्यात आला.

डॉ. डांगे यांनी सांगितले की, रासायनिक शेतीचा मानवी आरोग्यावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. सर्व साधने उपलब्ध असतानाही आपण एका विशिष्ट व्यवस्थेत अडकून पडलो आहोत. हा बदल दूरगामी असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. “जमीन सुपोषित ठेवायची असेल तर बियाण्यांपासून शेती पद्धतीपर्यंत नव्याने विचार करण्याची गरज आहे. भारताच्या भूमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, याच उद्देशाने हे अभियान राबविले जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

हे अभियान दरवर्षी देशभरात एक महिना राबविले जाते. यंदा 19 मार्चपासून अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर परिसरात हे अभियान सुरू होणार असून देशभरातून सुमारे 5 हजार कृषीप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाची भक्कम साथ आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांनी गावागावातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती सुनिश्चित करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या अभियानासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा, सहकार्य आणि नियोजन करण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत संपूर्ण सहकार्याची ग्वाही देण्यात आली.

Advertisement

Comments

No comments yet.