नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी - नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ एप्रिलपासून देशातील आयकर रचनेत मोठे फेरबदल होणार आहेत. अनेक दशकांपासून करदात्यांच्या परिचयाचे असलेले आयकर फॉर्म्स आता नव्या रूपात आणि नव्या क्रमांकासह समोर येणार आहेत. प्राप्तिकर विभागाने 'आयकर नियम २०२६' चा मसुदा सादर केला असून, यामुळे पगारदार वर्गापासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांवरच मोठा परिणाम होणार आहे.
फॉर्म १६ आणि २६एएएस चे नामांतर
नोकरदार वर्गासाठी सर्वात महत्त्वाचा असलेला 'फॉर्म १६' (पगारावरील TDS प्रमाणपत्र) आता 'फॉर्म १३०' या नावाने ओळखला जाईल. तसेच, करदात्याच्या गुंतवणुकीचा आणि कर कपातीचा आरसा मानला जाणारा 'फॉर्म २६एएस' आता 'फॉर्म १६८' मध्ये रूपांतरित होणार आहे. प्राप्तिकर विभागाने फॉर्मची संख्या आणि त्यांची रचना सोपी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.
काय बदलणार आणि काय नाही?
तज्ज्ञांच्या मते, केवळ फॉर्मचे क्रमांक आणि तांत्रिक स्वरूप बदलणार आहे; त्यांच्या मूळ उद्देशात कोणताही मोठा बदल झालेला नाही.
फॉर्म १३० (पूर्वीचा फॉर्म १६): कंपन्यांना दरवर्षी १५ जूनपर्यंत कर्मचाऱ्यांना देणे अनिवार्य असेल. यात उत्पन्न, वजावट आणि कपात केलेल्या कराचा तपशील असेल.
एकीकरण: फॉर्म ३सीए (3CA), ३सीबी (3CB) आणि ३सीडी (3CD) हे आता एकत्रित करून 'फॉर्म २६' या एकाच अर्जात समाविष्ट केले जातील. यामुळे कागदपत्रांची गुंतागुंत कमी होण्यास मदत होईल.
जुनी कर प्रणाली पुन्हा ठरणार फायदेशीर?
आयकर कायदा २०२५ लागू झाल्यानंतर, पगारदार करदात्यांच्या वेतन रचनेत (Salary Structure) बदल अपेक्षित आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते, या नवीन सुधारणांमुळे 'जुनी कर प्रणाली' (Old Tax Regime) पुन्हा एकदा करदात्यांसाठी आकर्षक ठरू शकते.
अंमलबजावणीची प्रक्रिया
सध्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) या मसुद्यावर विविध भागधारकांकडून मते आणि सूचना मागवल्या आहेत. १ एप्रिलपूर्वी या नवीन कायद्याला संसदेची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच हे नवीन नियम अधिकृतपणे लागू होतील.
महत्त्वाचे बदल एका नजरेत:
जुना फॉर्म १६ \आता फॉर्म १३०
जुना फॉर्म २६एएस \आता फॉर्म १६८
इतर बदल: फॉर्म १३, १६ए, २४क्यू, २६क्यू आणि २७क्यू यांचेही क्रमांक बदलणार.
टॅक्स ऑडिट फॉर्म: ३सीए, ३सीबी आणि ३सीडी यांचे विलीनीकरण होऊन नवा फॉर्म २६ येणार.