येवला नगरपालिकेची लॉटरी.. तब्बल ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर...

Share:
Main Image
Last updated: 18-Feb-2026

येवला, (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी - माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, जलसंधारण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येवला शहराने राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक पटकावला असून येवला नगर परिषदेला ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आलेल्या या अभियानात हरित आच्छादन वाढविणे, जलसंवर्धन उपक्रम, सौरऊर्जेचा वापर, प्लास्टिकमुक्त उपक्रम, नदी-नाले स्वच्छता, वृक्षारोपण व जैवविविधतेचे संवर्धन अशा विविध बाबींवर गुणांकन करण्यात आले. या सर्व घटकांमध्ये येवला शहराने सातत्यपूर्ण व परिणामकारक कामगिरी करत विभागीय पातळीवर उल्लेखनीय स्थान मिळविले.

येवला शहरात राबविण्यात आलेल्या प्रमुख उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्यांचे संगोपन, पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग), सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची उभारणी,जलसंधारण व स्वच्छता मोहिमा, नागरिकांचा सक्रिय सहभाग व जनजागृती अभियान या सर्व प्रयत्नांमुळे येवला शहर पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

बक्षीसाच्या रकमेतून होणार ही विकासकामे

सदर बक्षीस रकमेचा विनियोग हा निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय योजना हाती घेण्यासाठी करण्यात यावा यासाठी प्राधान्य असणार आहे.

यामध्ये १) शहराचे / गावाचे हरित आच्छादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाय योजना (जैवविविधतेच्या संवर्धनासह) उदा. मियावाकी वृक्षारोपण, अमृत वन, स्मृती वने, शहरी वने, सार्वजनिक उद्याने

२) जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल (जैवविविधतेच्या संवर्धनासह)

३) रोपवाटिकांची निर्मिती

४) जलसंवर्धनाचे उपक्रम

५) रेन वॉटर हार्वेस्टिंग व परकोलेशन

६) नदी, तळे व नाले यांचे पुनर्जीवीकरण

७) नूतनीकरणयोग्य ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उपाय योजना

८) सौरऊर्जेवर चालणारे / एलईडी चालणारे दिवे

९) विद्युत वाहनांना प्रोत्साहन – चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे

१०) माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस वितरणासाठी

प्रतिक्रिया

“येवला शहराने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक मिळवून ७५ लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी दिलेला सक्रिय प्रतिसाद आणि नगर परिषदेचे नियोजनबद्ध काम यामुळे हे यश शक्य झाले. भविष्यातही येवला शहर हरित, स्वच्छ व शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास आहे.”

छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य.


पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. येवला शहराने दाखविलेली एकजूट आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे हे यश मिळाले आहे. ७५ लाख रुपयांच्या बक्षीस रकमेतून आणखी पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल.

समीर भुजबळ, माजी खासदार

 
माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये येवला शहराला राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक मिळून ७५ लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले, ही संपूर्ण येवलाकरांसाठी अभिमानाची बाब आहे. नगर परिषद, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले. प्राप्त झालेली बक्षीस रक्कम हरित आच्छादन वाढविणे, जलसंवर्धन, सौरऊर्जा प्रकल्प आणि स्वच्छता उपक्रम यांसाठी प्रभावीपणे वापरण्यात येईल.

- राजेंद्र लोणारी, नगराध्यक्ष, येवला नगरपालिका

Advertisement

Comments

No comments yet.