राष्ट्रवादीचे विलीनीकरण कधी आणि कसे होणार? छगन भुजबळ यांनी स्पष्ट अजेंडाच सांगून टाकला...

Share:
Main Image
Last updated: 14-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १४ फेब्रुवारी - अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "विलीनीकरणाची एवढी घाई कशाला? नवे नेतृत्व आता निर्णय घेईल," अशा शब्दांत त्यांनी सध्या सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले.

अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. काही आमदारांनीही तशी इच्छा व्यक्त केली आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, "विलीनीकरण करायचे असेल तर ते आजही होऊ शकते किंवा महिनाभरानेही. त्यात घाई करण्याचे काहीच कारण नाही. आता नवीन कॅप्टन (नेतृत्व) नेमले आहेत, ते यावर विचार करतील आणि आमदारांशी चर्चा करून निर्णय घेतील."

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
छगन भुजबळ यांनी यावेळी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले. "सुनेत्राताई सध्या उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवणे हा आमचा १०० टक्के अजेंडा आहे," असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. विलीनीकरणाचा प्रस्ताव माझ्यासमोर कधीही आलेला नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नरहरी झिरवाळ यांच्या लाच प्रकरणावर प्रतिक्रिया
मंत्रालय कार्यालयातील लाच प्रकरणावरून नरहरी झिरवाळ यांच्यावर होत असलेल्या टीकेवरही भुजबळांनी मत व्यक्त केले. "झिरवाळ यांनी स्वतःच सांगितले आहे की, जर या प्रकरणात त्यांचे नाव आले तर ते राजीनामा देतील. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करतील आणि लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित पवारांच्या पश्चात आता पक्ष कोणत्या दिशेने जाणार आणि विलीनीकरणाचा निर्णय कधी होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.