भाजपचा ‘सर्जिकल स्ट्राईक’... या दिग्गज नेत्यांसह एकाचवेळी ६९ जण ६ वर्षे निलंबित...

Share:
Main Image
Last updated: 11-Feb-2026

पुणे, (प्रतिनिधी) ११ फेब्रुवारी - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आणि अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांवर भारतीय जनता पक्षाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरातील तब्बल ६९ कार्यकर्त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त टिकवण्यासाठी भाजपने हे कठोर पाऊल उचलले आहे.

या नेत्यांवर पडली संक्रांत:
निलंबित करण्यात आलेल्या ६९ जणांच्या यादीत अमोल बालवडकर, धनंजय जाधव, चंद्रकांत पाटे, कादंबरी साळवी, जितेंद्र टकले, किशोर तरवडे, सोमनाथ गुंड, संदीप लोणकर यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांना आता पुढील सहा वर्षे भाजपमध्ये कोणतेही स्थान किंवा संघटनात्मक जबाबदारी मिळणार नाही.

पक्षशिस्तीचा कडक संदेश:
"पक्षाच्या निर्णयाविरोधात जाऊन बंडखोरी करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही," असा स्पष्ट संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. पुणे शहराध्यक्षांनीही या कारवाईची पुष्टी केली असून, भविष्यातही पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.

राजकीय परिणाम:
पुणे महापालिका आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. एकाच वेळी ६९ कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने पक्षात काही काळ अस्वस्थता निर्माण होऊ शकते, मात्र शिस्तीच्या बाबतीत तडजोड न करण्याचा पवित्रा पक्षाने घेतल्याचे दिसत आहे.

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.