मुंबई, (प्रतिनिधी) १० फेब्रुवारी - गेल्या अनेक दिवसांपासून टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत-पाक सामन्यावरून सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. भारतीय संघाचा नाद करणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) कडक भूमिकेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) अखेर शरणागती पत्करावी लागली आहे. १५ फेब्रुवारी रोजी होणारा भारत-पाकिस्तान महामुकाबला आता नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने भारतात येण्यास नकार दिल्याचा मुद्दा पुढे करत पाकिस्ताननेही भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा पवित्रा घेतला होता. पाकिस्तान सरकारने या संदर्भात पीसीबीला आदेश दिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या निर्णयामुळे आयसीसीचे कोट्यवधींचे नुकसान होणार होते, ज्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागणार होते.
आयसीसीचा 'फुल अँड फायनल' इशारा
पाकिस्तानच्या हट्टापायी सामन्यावर टांगती तलवार असतानाच आयसीसीने रविवारी लाहोरमध्ये पीसीबीच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. सुमारे पाच तास चाललेल्या या बैठकीत आयसीसीने ठणकावून सांगितले की, "जर पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर कडक निर्बंध लादले जातील, तसेच आयसीसीच्या महसुलातील त्यांचा वाटा रोखला जाईल." या आर्थिक कोंडीच्या भीतीमुळे पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली.
पाकिस्तानच्या 'अजब' अटी फेटाळल्या
सामना खेळण्यासाठी पाकिस्तानने आयसीसीसमोर काही अटी ठेवल्या होत्या:
१. भारतासोबत पुन्हा द्विपक्षीय मालिका सुरू करावी.
२. आयसीसीच्या महसुलात पाकिस्तानचा वाटा वाढवावा.
३. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दंड आकारला जाऊ नये.
मात्र, आयसीसीने यातील एकही मागणी मान्य केली नाही. द्विपक्षीय मालिकेचा निर्णय हा दोन्ही देशांच्या सरकारचा विषय असल्याचे सांगत आयसीसीने हात झटकले. शेवटी, चहुबाजूंनी कोंडी झालेल्या पाकिस्तानला "झुकून" भारताविरुद्ध मैदानात उतरण्यास होकार द्यावा लागला.
चाहत्यांची उत्सुकता शिगेला
आयसीसीच्या या निर्णयामुळे आता १५ फेब्रुवारीला क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लढत पाहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे हा सामना रंगणार आहे. "भारताचा नाद केल्यावर काय होतं," याची चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगू लागली असून, भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे