मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर... विमानतळासह या विकासकामांचे भूमिपूजन...

Share:
Main Image
Last updated: 07-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ फेब्रुवारी - नाशिकच्या विमानतळाचे लवकरच विस्तारीकरण होणार असून, या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा उद्या दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व राज्यातील सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी “नाशिकला दत्तक घेतले आहे” असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. त्याच भूमिकेतून, त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि विकासाभिमुख व्हिजननुसार नाशिक विमानतळाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विमानतळाचा विकास करण्यात येत आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विमानतळाची क्षमता वाढवली जात आहे.

औद्योगिक, व्यापारी व रोजगारनिर्मितीस चालना 
नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील अंबड, सातपूर, सिन्नर, मालेगाव, इगतपुरी यांच्यासह धुळे एमआयडीसी, जळगाव एमआयडीसी, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नंदुरबार अशा प्रमुख औद्योगिक वसाहतींना या विमानतळाचा मोठा लाभ होणार आहे. 
जलद कार्गो सुविधा, वाढलेली विमानतळ क्षमता आणि आधुनिक लॉजिस्टिक्समुळे उद्योगांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोड मिळणार असून, ज्वेलरी, टेक्सटाईल, अ‍ॅग्रो-प्रोसेसिंग, फार्मा तसेच विविध उत्पादन क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी, स्थानिक तरुणांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

कृषी निर्यात व उत्तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेस गती
नाशिक जिल्हा द्राक्षे, कांदे, डाळिंब व प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. नवीन विमानतळामुळे आधुनिक कोल्ड-चेन सुविधा व जलद हवाई वाहतूक मिळून कृषी निर्यात अधिक वेगवान व स्पर्धात्मक होईल. याचा थेट फायदा शेतकरी, निर्यातदार, ऍग्रो-उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होणार आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाचे विशेष महत्त्व कुंभमेळ्याच्या कालावधीत अचानक वाढणारी प्रवासी संख्या, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, सुरक्षा दलांची जलद हालचाल, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनिक समन्वय यांसाठी हा विमानतळ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यामुळे कुंभमेळ्याचे नियोजन अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे होऊन नाशिकची ओळख आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून अधिक बळकट होणार आहे. श्रद्धा, सुविधा आणि सुरक्षा यांचा संगम साधत, नाशिक विमानतळ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

नाशिक विमानतळ : जुने व नवीन 
टर्मिनल क्षेत्रफळ : जुने ६,२६० चौ.मी. । नवीन १८,२५० चौ.मी.
प्रवासी क्षमता (प्रति तास) : जुने ३०० । नवीन १,००० प्रवासी
उड्डाण सुविधा : जुने फक्त देशांतर्गत । नवीन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय
चेक-इन व्यवस्था : जुने मर्यादित । नवीन २४ चेक-इन काउंटर व दुहेरी उंचीचा हॉल
सुरक्षा तपासणी : जुने मर्यादित । नवीन ८ हँड बॅगेज एक्स-रे युनिट्स
आंतरराष्ट्रीय सुविधा : जुने अनुपलब्ध । नवीन इमिग्रेशन, कस्टम्स, ड्युटी फ्री, लाउंज, एटीएम, चलन विनिमय
बॅगेज हँडलिंग : जुने साधे । नवीन अत्याधुनिक बॅगेज हँडलिंग सिस्टीम
प्रस्थान गेट्स : जुने मर्यादित । नवीन ७ गेट्स (५ इन-कॉन्टॅक्ट, २ रिमोट)
एप्रन व टॅक्सी लेन : जुने मर्यादित । नवीन ७३,००० चौ.मी. एप्रन व ४३,००० चौ.मी. टॅक्सी लेन
विमान पार्किंग क्षमता : जुने ६ विमाने । नवीन १८ विमाने
विमान ये-जा क्षमता : जुने १० । नवीन ५०० (२५० लँडिंग, २५० टेक-ऑफ)
एरोब्रिज : जुने नाही । नवीन ६ एरोब्रिज
एस्केलेटर व लिफ्ट्स : जुने नाही । नवीन ९ एस्केलेटर व १० लिफ्ट्स
पार्किंग सुविधा : जुने मर्यादित । नवीन ७०० कार, २०० टॅक्सी व १० बस नागरी एन्क्लेव्ह : जुने पारंपरिक । नवीन IATA मानकांनुसार डिझाइन

 अनुभवी संस्थेकडे प्रकल्पाची जबाबदारी याआधी नाशिक विमानतळाची उभारणी अवघ्या ११ महिन्यांत पूर्ण करणाऱ्या आणि सहा विमानतळांच्या कामाचा अनुभव असलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे या नवीन आधुनिक विमानतळाच्या उभारणीची जबाबदारी देण्यात आली असून, हा प्रकल्पही विक्रमी ११ महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. 
 मान्यवरांची उपस्थिती 
या भूमिपूजन सोहळ्यास उद्घाटक व अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभ तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महाराष्ट्र शासन विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे, तसेच सर्व खासदार, आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ग्रामविकास विभाग प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, म.रा.पा.सु.वि. महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, एच.ए.एल. ओझर चे सी. इ.ओ. साकेत चतुर्वेदी, म.रा.पा.सु.वि. महामंडळचे मुख्य अभियंता रणजित हांडे आदी उपस्थित राहणार आहेत.

राज्य व देशपातळीवरील कनेक्टिव्हिटीला नवे बळ- "नाशिक विमानतळाच्या विकासामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, मुंबई–आग्रा महामार्ग तसेच प्रस्तावित वाढवण बंदर यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांशी नाशिकची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होणार आहे. या विमानतळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तब्बल २१ जिल्ह्यांना प्रवासी तसेच कार्गो वाहतुकीसाठी जलद व प्रभावी हवाई दळणवळण उपलब्ध होणार आहे. हा विमानतळ महाराष्ट्रातील पाचवा सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज विमानतळ ठरणार असून, उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे" . कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन.
Advertisement

Comments

No comments yet.