नाशिक शहरात तिघांची आत्महत्या... कारण काय?

Share:
Main Image
Last updated: 25-Nov-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २५ नोव्हेंबर - शहरातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या तीन तरुणांनी मंगळवारी (दि. २४) गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. पंचवटी, नाशिकरोड आणि अंबड औद्योगिक वसाहत या तीन परिसरांत या घटना घडल्या असून, तिघांच्याही टोकाच्या पावलामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पंचवटीत तरुणाची आत्महत्या

पहिली घटना पंचवटी परिसरातील काकड बाग (मोरेमळा) येथे घडली. मूळचे टेहरे (ता. मालेगाव) येथील रहिवासी असलेले आणि सध्या काकड बाग परिसरात राहणारे सोनू पंढरीनाथ पगार (वय ३२) यांनी मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या टेरेसवरील देवघरात लोखंडी पाईपला साडी बांधून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्यांचे मेहुणे राजाराम मटाले यांनी त्यांना तातडीने बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून हवालदार बाविस्कर तपास करत आहेत.

जेलरोड परिसरात ३४ वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल

दुसरी घटना नाशिकरोड येथील जेलरोड भागातील श्रमिकनगर झोपडपट्टीत घडली. योगेश बालाजी शिंदे (वय ३४) यांनी मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लाकडी बल्लीला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी बिटको रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाशिकरोड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून हवालदार झाडे पुढील तपास करत आहेत.

अंबड औद्योगिक वसाहतीत तरुणाची जीवनयात्रा समाप्त

तिसरी घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर (दातीरनगर) भागात घडली. सुनीत कंपनीमागील मारुती संकुल येथे राहणाऱ्या विजय चंद्रकांत वाघ (वय २७) या तरुणाने मंगळवारी राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला कपडा बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच त्यांचा मावस भाऊ योगेश पानपाटील यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार झोले तपास करत आहेत.

एकाच दिवसात शहराच्या तीन वेगवेगळ्या भागांत तरुणांनी जीवन संपवल्याच्या या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिघांनीही हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

Comments

No comments yet.