नाशिकरोडला १.५६ कोटींची फसवणूक... रक्कम घेऊनही मिळकतीची परस्पर विक्री...

Share:
Main Image
Last updated: 24-Nov-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २४ नोव्हेंबर - मिळकतीच्या व्यवहारापोटी तब्बल १ कोटी ५६ लाख रुपयांहून अधिक रक्कम स्वीकारूनही ती मिळकत बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील मीरारोड येथील एका व्यावसायिकाची फसवणूक झाली असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध विश्वासघात आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र देविदास रोडे आणि संदेश संजय आडके (दोघेही रा. नाशिकरोड, नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मनिष वसंत बलदोटा (रा. मीरारोड, जि. ठाणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी मनिष बलदोटा यांची २०१६ मध्ये संशयित महेंद्र रोडे आणि संदेश आडके यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून मौजे देवळाली येथील सिटी सर्व्हे क्रमांक ३७७८ ते ३७८३ मधील सर्व्हे क्रमांक २३७ अ - २७, प्लॉट क्रमांक २७, क्षेत्र ८००.०० चौरस मीटरवरील 'देविदास संकुल' तसेच सर्व्हे क्रमांक १३५ ए-१-ए१-२-९-५, सीटीएस क्रमांक ५५४० येथील ८०० चौरस मीटर मिळकतीसंदर्भात व्यवहार निश्चित झाला होता.

हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी बलदोटा यांनी रोख रकमेसह बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत संशयित महेंद्र रोडे आणि संदेश आडके यांना एकूण १ कोटी ५६ लाख २८ हजार ७१९ रुपये अदा केले होते. या व्यवहाराची बी. के. सिंग यांच्या नोटरी रजिस्टरवर नोंदणीही करण्यात आली होती.

मात्र, मोठी रक्कम देऊन आणि नोंदणी करूनही संशयितांनी संबंधित मिळकतीचे बनावट कागदपत्र तयार केले आणि ती मिळकत परस्पर अन्य व्यक्तींना विक्री करून आपला विश्वासघात व मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे बलदोटा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, उपनिरीक्षक बिडकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

Comments

No comments yet.