नाशिक, (प्रतिनिधी) २४ नोव्हेंबर - गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरात काल सापडलेल्या प्राचीन शिवलिंग आणि मंदिराच्या अवशेषांची केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) गंभीर दखल घेतली आहे. या ऐतिहासिक वास्तूसंदर्भात पाठवण्यात आलेल्या सविस्तर ई-मेलनंतर विभागाने तात्काळ प्रतिसाद दिला असून, छत्रपती संभाजीनगर सर्कलचे वरिष्ठ अधिकारी व अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ (Superintendent Archaeologist) अरुण मलिक हे गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी आपल्या तज्ज्ञ पथकासह नाशिक येथे प्रत्यक्ष पाहणीसाठी येणार आहेत.
काल या परिसरात खोदकामादरम्यान प्राचीन शिवलिंग आणि मंदिराचे महत्त्वपूर्ण अवशेष आढळून आले होते. या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने गोदाप्रेमी देवांग जानी यांनी तातडीने केंद्र पुरातत्त्व विभागाला सविस्तर माहिती व छायाचित्रे ई-मेलद्वारे पाठवली होती. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत आज केंद्र पुरातत्त्व विभागातून त्यांना थेट दूरध्वनी आला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्याबाबत कळवण्यात आले.
दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या पथकाचा हा पाहणी दौरा पूर्ण होईपर्यंत आणि या प्राचीन अवशेषांची तांत्रिक व ऐतिहासिक तपासणी होईपर्यंत संबंधित ठिकाणचे सुरू असलेले सर्व काम तात्काळ बंद ठेवण्याच्या स्पष्ट सूचना पुरातत्त्व विभागाने दिल्या आहेत. अवशेषांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
नाशिकला प्राचीन मंदिरांचा आणि तीर्थक्षेत्रांचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. नव्याने सापडलेल्या या अवशेषांमुळे शहराच्या प्राचीन इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. पुरातत्त्व विभागाने घेतलेली ही तत्पर दखल नाशिकचा हा अनमोल ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक टप्पा मानला जात आहे, अशी माहिती गोदाप्रेमी देवांग जानी यांनी दिली आहे.