नाशिक, (प्रतिनिधी) ३० ऑक्टोबर - नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पावन पर्वाला अत्यंत धार्मिक, आध्यात्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग म्हणून शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) तपोवन मैदान येथून 'महाध्वज ग्राम परिक्रमे'चा मोठ्या थाटामाटात प्रारंभ झाला. याचबरोबर, शनिवारी होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक रामतीर्थ येथे गोदावरी मातेचे पूजन करून विविध धार्मिक विधी पार पाडले.
तपोवन येथून 'महाध्वज ग्राम परिक्रमा' रवाना
तपोवन मैदानावर आयोजित भव्य सोहळ्यात जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराज यांच्या शुभहस्ते महाध्वजाचे विधीवत पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गणेश वंदनेने आणि वेदोक्त मंत्रोच्चारांच्या जयघोषात महाध्वज परिक्रमेसाठी सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर संत-महंत आणि हजारो भाविकांच्या अभूतपूर्व सहभागाने हा महाध्वज रामतीर्थ पंचवटीच्या दिशेने रवाना करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, "सिंहस्थ कुंभमेळा ही नाशिकची धार्मिक अस्मिता आणि सनातन हिंदू धर्माची गौरवशाली परंपरा जपणारा जागतिक महोत्सव आहे. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सर्व सोयींनी युक्त वातावरण देणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. संत-महंतांचे मार्गदर्शन आणि समाजाच्या सहकार्याने हा कुंभमेळा अभूतपूर्व यशस्वी केला जाईल."
रामतीर्थावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गंगापूजन व धार्मिक विधी
शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक पवित्र रामतीर्थावर जाऊन गोदावरी मातेचे पूजन केले. याप्रसंगी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विविध धार्मिक विधी पार पडले:
शास्त्राक्त विधी: गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, सर्वतोभद्र मंडळ पूजन, योगिनी पूजन, क्षेत्रपाल पूजन आणि ध्वजस्तंभ स्नपन विधी पार पडले.
ध्वजस्तंभ प्राणप्रतिष्ठा: कुंभमेळ्याच्या मुख्य ध्वजस्तंभाची प्राणप्रतिष्ठा देखील या वेळी धार्मिक परंपरेनुसार करण्यात आली.
या धार्मिक विधींनंतर पालकमंत्री महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन महामहिम राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आणि प्रशासकीय व्यवस्थांचा सविस्तर आढावा घेतला.
मान्यवर आणि संत-महंतांची मांदियाळी
या संपूर्ण सोहळ्याला राजकीय, प्रशासकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती लाभली:
लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी: महापौर हिमगौरी आडके (अहिरे), आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री.
संत-महंत व आखाडा परिषद: श्रीमहंत ज्ञानदास महाराज, मंगलपीठाधीश्वर श्री १००८ माधवाचार्य महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज, श्री पंच निर्मोही अग्नी आखाड्याचे श्रीमहंत राजेंद्रदास महाराज, महंत संजयदास महाराज, श्रीमहंत मुरलीदास महाराज, श्रीमहंत वैष्णवदास महाराज, पंच दिगंबर अग्नी आखाड्याचे श्रीमहंत माधवदास महाराज, श्रीमहंत मोहनदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत रामस्नेही महाराज, जगद्गुरू वल्लभाचार्य महाराज आणि पुरोहित संघाचे पदाधिकारी.
सामाजिक समरसता आणि सेवाभावाचा संकल्प
पालकमंत्री महाजन यांनी स्पष्ट केले की, महाध्वज ग्राम परिक्रमेमुळे कुंभमेळ्याचा धार्मिक संदेश घराघरांत पोहोचण्यास मदत होणार आहे. या कुंभमेळ्याच्या माध्यमातून केवळ धार्मिक विधी नव्हे, तर सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सेवाभाव यांचा संदेश जगभरात पोहोचवण्याचा शासनाचा दृढ संकल्प आहे.
महंत संजयदास महाराज यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त करत कुंभमेळ्याच्या आयोजनास शुभेच्छा दिल्या. या धार्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण नाशिक आणि पंचवटी परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला आहे.