जळगाव, (प्रतिनिधी) २२ सप्टेंबर - जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, वीजतारा, वीज साहित्य तसेच घरफोड्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात विशेष मोहीम राबवावी. वारंवार चोरी होणाऱ्या भागांची स्वतंत्र नोंद करून तेथे रात्रीची गस्त वाढवावी आणि पोलीस व महावितरण विभागाने समन्वयाने ठोस व परिणामकारक कारवाई करावी, असे कडक निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील वीज तारा व विद्युत साहित्य चोरीस आळा घालण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांबाबत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेर, मुक्ताईनगर व बोदवड परिसरातील वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता या बैठकीत मांडली होती.
चोरीच्या मुळापर्यंत जा; गरज भासल्यास नदीकाठच्या भागात बोटीने गस्त घाला
बैठकीत बोलताना पालकमंत्री म्हणाले, "शेतकऱ्याची मोटार चोरीला जाणे ही केवळ एका वस्तूची चोरी नसून त्यामुळे सिंचन थांबते, पीक धोक्यात येते आणि आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर मोठा आर्थिक भार पडतो. त्यामुळे या घटनांकडे किरकोळ गुन्हा म्हणून न पाहता, केवळ आरोपी पकडण्यापुरता तपास मर्यादित ठेवू नका. चोरीचा माल शेवटी कुठे जातो, तो कोण खरेदी करतो आणि यामागे कोणती संघटित टोळी अथवा साखळी कार्यरत आहे का, याच्या मुळापर्यंत जा."
रावेर-मुक्ताईनगर-बोदवड भागातील घटनांचा एकत्रित तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच नदीकाठच्या व नदीलगतच्या गावांमध्ये आवश्यकतेनुसार बोटीद्वारे गस्त घालण्याची व्यवस्था करण्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पोलीस आणि महावितरणने 'ॲक्शन मोड'मध्ये काम करावे
महावितरणने वारंवार वीजतारा चोरी होणारे संवेदनशील मार्ग निश्चित करून त्याची माहिती पोलिसांना द्यावी. दोन्ही विभागांनी परस्परांवर जबाबदारी न ढकलता संयुक्त यंत्रणा उभी करून तातडीने 'ॲक्शन मोड'मध्ये काम करावे, असे निर्देशही देण्यात आले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली शेतकऱ्यांची व्यथा:
शेतकऱ्यांची बाजू मांडताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, "विद्युत साहित्य चोरीस गेल्यानंतर शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतो. केवळ गुन्हा नोंदवून न थांबता, चोरी करणाऱ्यांपासून ते चोरीचा माल विकत घेणाऱ्यांपर्यंतच्या संपूर्ण साखळीवर कडक कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल असा कृती आराखडा दिसला पाहिजे."
स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) सादरीकरण:
बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी जिल्ह्यातील कॉपर, विद्युत मोटारी व वीजतारा चोरीच्या घटनांचे स्वरूप, संवेदनशील ठिकाणे आणि पोलिसांच्या उपाययोजनांबाबत विस्तृत सादरीकरण (Presentation) केले. त्यांनी महावितरणकडून अपेक्षित सहकार्याची माहितीही मांडली.
या बैठकीस आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
https://t.co/mxOU2fFitc