नाशिक, (प्रतिनिधी) १८ सप्टेंबर - नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक ओळख जगभरात पोहोचवण्यासाठी व्यापक व प्रभावी माध्यम आराखडा (Media Plan) तयार करण्याचे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले. कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीनंतर ब्रिजेश सिंह यांनी ऐतिहासिक रामकुंड परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि भाविकांच्या सोयीसुविधांसह प्रसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व सूचना:
पारंपरिक अन् डिजिटल माध्यमांचा मेळ: जागतिक ब्रँडिंगसाठी पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचा समन्वयित वापर करून सूक्ष्म नियोजन करावे.
नाशिकच्या वारशाचे प्रभावी सादरीकरण: गोदावरी नदी, ऐतिहासिक तीर्थस्थळे, अध्यात्मिक ठिकाणे, स्थानिक कला, खाद्यपरंपरा आणि संस्कृतीचे देश-विदेशातील भाविकांसाठी विशेष आशयनिर्मितीद्वारे (Content Creation) सादरीकरण केले जावे.
पायाभूत सुविधांची माहिती अन् अफवांचे खंडन: कुंभमेळ्यानिमित्त जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, तसेच सोशल मीडियावरील चुकीच्या बातम्या आणि अफवांचे तातडीने खंडन करावे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महासंचालकांचे विशेष कार्य अधिकारी इर्शाद बागवान आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.