पोलिसाच्या भावालाच ९ लाखांचा गंडा... ८ जणांवर गुन्हा...

Share:
Main Image
Last updated: 16-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १६ सप्टेंबर -  बहिणीला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोलमजुरी करणाऱ्या एका पोलिसाच्या भावाची तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट नियुक्तीपत्र देऊन पैसे उकळल्यानंतर ते परत मागितले असता जीवे मारण्याची आणि पोलिसात असलेल्या भावाची नोकरी घालवण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नातेवाईकांसह आठ संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांची नावे

सतीश वानखेडे, विष्णू माळी, प्रदीप माळी (सर्व रा. ठाणे), रोहित पाटोळे, ॲड. प्रतिभा चव्हाण-माळी (रा. वांद्रे), राजेंद्र चव्हाण, जितेंद्र चव्हाण व कुसुम चव्हाण (सर्व रा. कोणार्कनगर, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

नेमकी घटना काय?

Advertisement

ग्रामीण पोलीस दलाच्या आडगाव मुख्यालयात राहणारे रोहित संतोष दाभाडे (वय २६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रोहित हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात, तर त्यांचे बंधू पोलीस दलात कार्यरत आहेत. फिर्यादीनुसार, नातेवाईक असलेल्या संशयितांनी एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रोहित यांच्या बहिणीला सरकारी नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवले.

नातेवाईक असल्याने दाभाडे कुटुंबीयांचा विश्वास बसला. त्यानंतर संशयितांनी बहिणीच्या नावे बनावट नियुक्तीपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ९ लाख रुपये भरण्यास भाग पाडले.

पैसे मागताच धमकी

पैसे देऊनही बहिणीला प्रत्यक्ष नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे रोहित दाभाडे यांच्या लक्षात आले. त्यांनी संशयितांकडे पैशांची मागणी केली असता सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर पैशांसाठी तगादा लावला असता, संशयितांनी रोहित यांना जीवे ठार मारण्याची तसेच पोलीस दलात असलेल्या त्यांच्या भावाची नोकरी घालवण्याची धमकी दिली.

अखेर दाभाडे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी आठही संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक पंचमुख पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.