नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १६ सप्टेंबर - ॲप आधारित राइड-बुकिंग प्लॅटफॉर्म 'रॅपिडो'चे संचालन करणाऱ्या 'रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड'ला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) चांगलाच दणका दिला आहे. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, अनुचित व्यापार पद्धती आणि 'डार्क पॅटर्न'चा (Dark Patterns) वापर केल्याप्रकरणी सीसीपीएने रॅपिडोला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीसीपीएच्या मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांनी हे आदेश जारी केले.
नक्की काय आहे प्रकरण?
राइड-हेलिंग आणि बाईक-टॅक्सी प्लॅटफॉर्म्सची तपासणी करत असताना रॅपिडोच्या ॲपमध्ये अनेक त्रुटी आणि ग्राहकांवर दबाव आणणाऱ्या पद्धती आढळल्या:
कृत्रिम दबाव (कन्फर्म शेमिंग): प्रवाशाने राईड बुक केल्यानंतर "अधिक किंमत द्या, वाहन मिळण्याची शक्यता वाढेल" किंवा "कॅप्टन मूळ भाडे स्वीकारत नाहीत, ₹१०, ₹२०, ₹३० जोडून पहा" असे मेसेज दाखवून प्रवाशांवर अतिरिक्त पैसे देण्यासाठी दबाव आणला जात होता.
राईड आधी टिप मागणे गैरकायदेशीर: टिप ही नेहमी सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वेच्छेने दिली जाते. मात्र, रॅपिडो राईड सुरू होण्यापूर्वीच अतिरिक्त पैसे मागून घाईची आणि भीतीची कृत्रिम परिस्थिती निर्माण करत होती.
दाव्यांचा पुरावा नाही: अतिरिक्त पैसे दिल्याने राईड मिळण्याची शक्यता खरोखरच वाढते, याचा कोणताही ठोस डेटा किंवा पुरावा रॅपिडो प्रशासनाला सादर करता आला नाही.
नियम आणि पुढील निर्देश
'मोटर वाहन ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे, २०२५' नुसार, 'टिप'चा पर्याय हा केवळ राईड पूर्ण झाल्यानंतरच दिला पाहिजे; बुकिंगच्या वेळी किंवा राईड सुरू असताना नाही. त्यामुळे सीसीपीएने रॅपिडोला अशा सर्व दिशाभूल करणाऱ्या सूचना आणि पद्धती तात्काळ बंद करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
ओला आणि उबरही रडारवर
ही कारवाई रॅपिडोपुरती मर्यादित नसून राइड-हेलिंग क्षेत्रातील 'डार्क पॅटर्न्स' रोखण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक मोहिमेचा भाग आहे. सीसीपीएने ओला, उबर आणि नम्मा यात्री यांसारख्या इतर प्रमुख प्लॅटफॉर्म्सनाही नोटिसा बजवल्या असून ओला (Ola) आणि उबर (Uber) यांची तपासणी सध्या सुरू आहे.