समृद्धी महामार्गावर असा टाकायचे दरोडा... नाशिक पोलिसांनी ४८ तासांत लावला छडा... उघड झाल्या या धक्कादायक बाबी...

Share:
Main Image
Last updated: 01-Sep-2026

केशव खेडकर, (नाशिक) १ सप्टेंबर - समृद्धी महामार्गावर वाहनांच्या चाकापुढे लोखंडी वस्तू फेकून गाड्या अडवत प्रवाशांना मारहाण करून लुटणाऱ्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी ४८ तासांच्या आत पर्दाफाश केला आहे. धाराशिव जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाच वेळी रात्रभर पाळत ठेवून टाकलेल्या छाप्यात सात जणांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

लोखंडी वस्तू टाकून अडवली गाडी, प्रवाशांना मारहाण

दि. २७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब मारुती सुझुकी एक्सएल-६ कारने मुंबईच्या दिशेने जात होते. वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ५४२.१ (मलढोण शिवार) येथे अज्ञात आरोपींनी त्यांच्या धावत्या कारच्या चाकापुढे लोखंडी वस्तू भिरकावली. कार आदळल्याने चालकाने वाहन थांबवताच ११ ते १२ जणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्यांनी प्रवाशांना जबर मारहाण केली. यावेळी आरोपींनी १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम लुटली. याशिवाय पाठीमागून येणाऱ्या इतर गाड्यांनाही अडवून त्यातील प्रवाशांना मारहाण करत लुटण्यात आले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धाराशिवमधून ७ दरोडेखोर जेरबंद

घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला एम., उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व वावी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी धाराशिव जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

नाशिक पोलिसांच्या चार पथकांनी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी (RCP) व क्युआरटी (QRT) पथकांच्या मदतीने एकाच वेळी छापा टाकून सात आरोपींना बेड्या ठोकल्या:

 नितीन उर्फ सुनील हिरामण शिंदे (वय ३४, रा. खामकरवाडी, जि. धाराशिव)

 अशोक हिरामण शिंदे (वय ३७, रा. खामकरवाडी, जि. धाराशिव)

 अर्जुन व्यंकट पवार (वय ५५, रा. येरमाळा, जि. धाराशिव)

 धनाजी अर्जुन पवार (वय २२, रा. येरमाळा, जि. धाराशिव)

 गोविंद उर्फ रामा व्यंकट पवार (वय ५०, रा. उमरा, जि. धाराशिव)

 लखन भारत काळे (वय २२, रा. खामकरवाडी, जि. धाराशिव)

 गोविंद शिवाजी पवार (वय १९, रा. लक्ष्मीपीढी, जि. धाराशिव)

सराईत गुन्हेगार; चार साथीदार अद्याप फरार

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वीही बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि पुणे येथे दरोडा, जबरी चोरी आणि मोक्का अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या महिंद्रा एक्सयूव्ही ५०० (MH-42-H-9976 आणि MH-42-K-1777) या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने सर्व आरोपींना ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यातील अर्जुन बालाजी शिंदे, अनिकेत उर्फ अनिल बालाजी शिंदे, अशोक पोपट पवार आणि मुंबईत गंभीर गुन्हे दाखल असलेला शंकर बाजीराव काळे हे चार आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Comments

No comments yet.