नाशिक मनपा आयुक्तांचा ठेकेदाराला दणका... दररोज पावणेदोन लाखांचा दंड... (Video)

Share:
Main Image
Last updated: 01-Jul-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १ जुलै -  आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांमध्ये गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा कडक इशारा नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिला आहे. बॉश सर्कल परिसरातील वेद मंदिरासमोरील काँक्रीट रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना निकृष्ट दर्जा आढळून आल्याने, आयुक्तांनी संबंधित भाग तात्काळ पाडण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर कामातील गंभीर त्रुटींची दखल घेत संबंधित ठेकेदारावर प्रतिदिन तब्बल १ लाख ८४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

प्रत्यक्ष पाहणीत उघडकीस आल्या त्रुटी

कुंभमेळ्यानिमित्त शहरात विविध ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वतः मैदानात उतरून पाहणी दौरा केला. बॉश सर्कल ते वेद मंदिर दरम्यान सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याची तपासणी करत असताना, काही काँक्रीट पॅनेल्समध्ये निर्धारित मानकांपेक्षा अधिक आणि गंभीर स्वरूपाचे तडे (Cracks) गेल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. हा कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट होताच, आयुक्तांनी जागेवरच अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि तो निकृष्ट भाग तात्काळ पाडून नव्याने मजबूत काम करण्याचे आदेश दिले.

ठेकेदाराला मोठा आर्थिक दणका

Advertisement

सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला धडा शिकवण्यासाठी मनपा प्रशासनाने दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे. कामात मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर प्रतिदिन ₹१ लाख ८४ हजार याप्रमाणे मोठा दंड आकारण्यात आला आहे. यामुळे विकासकामे रेंगाळणाऱ्या आणि निकृष्ट काम करणाऱ्या इतर ठेकेदारांचेही धाबे दणाणले आहेत.

गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सर्वोच्च!

"नागरिकांच्या पैशातून आणि करातून होणाऱ्या प्रत्येक विकासकामात गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सर्वोच्च राहावे, यासाठी नाशिक महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहरातील सर्व कुंभमेळा कामांवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कोणत्याही एजन्सी अथवा ठेकेदाराविरुद्ध यापुढेही अशीच तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल, यात शंका नाही."

— मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका.

Advertisement

Comments

No comments yet.