‘किती खोके आणि एकदम ओक्के?’ टक्केवारी आणि दलालीच्या संभाषणाचा कथित व्हिडीओ व्हायरल...

Share:
Main Image
Last updated: 27-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २७ जून - "एकीकडे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतो आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचे काय उद्योग चालले आहेत ते बघा," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ शेअर करत सत्ताधारी महायुती सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. या कथित व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी टक्केवारी, कमिशन आणि दलालीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यासोबत लिहिलेले कॅप्शन सध्या जोरदार चर्चेत आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या कथित व्हिडिओतील संभाषणाचा संदर्भ देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. "हिशोब कसा ठरला? साठ… पाच.. एक-एक, चाळीस लाख, ७ टक्के, १ टक्के, २ टक्के, पैसे परत देतो. मालक कोण? वरती पण करावं लागतं…" असे म्हणत त्यांनी शासकीय कामांमध्ये किंवा कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण आणि कमिशनखोरी सुरू असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 'वरती पण करावं लागतं' या वाक्यावरून त्यांनी थेट मंत्रालयातील बड्या नेत्यांवर निशाणा साधल्याची चर्चा आहे.

जनतेच्या न्यायालयात टाकला चेंडू!

Advertisement

"हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघा आणि तुम्हीच ठरवून कमेंटमध्ये सांगा की आता ‘किती खोके आणि एकदम ओक्के’ म्हणायचं," असे आवाहन करत रोहित पवारांनी थेट जनतेलाच यावर प्रश्न विचारला आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करताना रोहित पवार यांनी #दलालीची_दलदल, #मलिदा_गँग आणि #कमिशनखोर अशा आक्रमक हॅशटॅगचा वापर केला आहे. राज्यातील विविध विकासकामांमध्ये आणि प्रशासकीय पातळीवर सत्ताधाऱ्यांकडून कशा प्रकारे टक्केवारी वसूल केली जात आहे, हेच या व्हिडिओतून उघड होत असल्याचा दावा ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून यावर काय स्पष्टीकरण येते आणि हा वाद आगामी काळात काय वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.