भारतात हवाई टॅक्सीची प्रायोगिक चाचणी कधी होणार... केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टच सांगून टाकलं...

Share:
Main Image
Last updated: 02-Jan-2026

पुणे, (प्रतिनिधी) १ जानेवारी - नागरी विमान वाहतूक क्षेत्रात भारताने नेत्रदीपक भरारी घेतली असून 2047 पर्यंत भारत जगात आपली ओळख निर्माण करेल. पूर्ण भारतीय प्रादेशिक विमान वाहतूक सुरू करण्यासाठी आमचे मंत्रालय प्रयत्नशील आहे. सध्या विमानाचे 30 ते 35 टक्के समभाग देशांतर्गत निर्माण होत असून ते प्रमाण वाढवण्यासाठी आगामी पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स मदतीने हवाई वाहतूक सुरळीत करण्यासोबत त्यावर आधारित विविध उपाययोजना राबविण्यासाठी संशोधनावर देखील भर दिला जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केले.

‘दी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद व 73व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन डॉ. एपीजे अब्दुल कलाम ऑडिटोरियम, एनडीए रोड, पाषाण, पुणे येथे करण्यात आले होते. 

'विकसित भारतासाठी एरोस्पेस क्षेत्रातील आव्हाने' या संकल्पनेवर ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. 

परिषदेचे उद्घाटन 'इस्रो'चे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ, डीआरडीओ'चे माजी अध्यक्ष व सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, महासंचालक प्रा. प्रतीक किशोर, 'डीआरडीओ' 'एचईएमआरएल'चे संचालक डॉ. ए. पी. दास, 'एआरडीई'चे संचालक अंकाती राजू, सहयोगी संचालक एम. व्ही. रमेश कुमार यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर दुपारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किजारापु राममोहन नायडू यांनी राष्ट्रीय परिषदेपुढे संबोधन केले. यावेळी संयुक्त अरब अमिराती येथील अबुधाबी स्कुल ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. तय्यब कमाली, इस्रोच्या सचिव, जेष्ठ शास्त्रज्ञ जेया संथी, महासंचालक प्रा. प्रतीक किशोर, संचालक डॉ.ए.पी.दास उपस्थित होते. यावेळी सोसायटीच्या स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या संबोधनात केंद्रीय मंत्री नायडू पुढे म्हणाले, एअरस्पेस क्षेत्रात जे बदल घडतात त्याचा फायदा सिव्हिल एव्हीएशन क्षेत्रास होत आहे. एरोनोटीकल सोसायटीचे 50 हजार शास्त्रज्ञ असून ते विविध विभागात काम करतात. देशाला नवीन आकार देण्याचे काम एरोनोटीकल सोसायटी देत आहे. या क्षेत्रात प्रत्येक आव्हान ही आपली संधी आहे त्यादृष्टीने आपण दूरदृष्टी ठेवून काम केले पाहिजे. जगात हवाई वाहतूक क्षेत्र सर्वाधिक वेगाने भारतामध्ये विकसित होत असून दरवर्षी 10 ते 12 टक्के विमान प्रवासी देशात वाढत आहेत. विमानतळांची संख्या मागील दहा वर्षात दुप्पट झाली आहे. पुढील पाच वर्षांत 50 नवीन विमानतळे, तर 2047 पर्यंत 200 नवी विमानतळे विकसित करण्यात येतील. नवी मुंबई, नोयडा विमानतळांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मुंबई, पुणे यासारख्या देशातील मोठ्या शहरातील हवाई वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व प्रवासी वेळ वाचविण्याकरिता आगामी काळात हवाई मंत्रालय सुरक्षित हवाई टॅक्सेस सेवा सुरू करण्यासाठी काम करत आहे, याची प्रायोगिक चाचणी 2026 मध्ये होणार आहे. भारतीय हवाई क्षेत्रात महिला वैमानिकांचे प्रमाण किमान 25 टक्के करण्याचे आम्ही लक्ष्य ठेवले आहे.

पुढे ते म्हणाले, भारताकडे ड्रोन निर्मितीची चांगली कौशल्य व क्षमता असून सध्या 30 हजार ड्रोन आहेत. 2047 पर्यंत ही संख्या तीस लाखांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करत स्टार्टअप मध्येही ड्रोन उत्पादकांनी व युवकांनी पुढाकार घ्यावा, ड्रोन उत्पादनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी यावरील अटी शिथिल करून आयात शुल्क कमी करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. 

डॉ. तय्यब कमाली यांनी सांगितले की, एरोस्पेस सह विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानामुळे बदल घडत आहे व त्यातील समस्या याचा दबाव सर्वांवर आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर विविध क्षेत्रात होऊ लागला आहे. रुग्णांचे आजार निदान करणे तसेच शस्त्रक्रिया यात एआयमुळे अचूकता आली आहे. वॉशिंग्टन मध्ये प्रवासी विमान व हेलिकॉप्टर धडकल्याची घटना नुकतीच घडली, पण त्याजागी एआय वापर झाला असता तर घटना टळू शकली असती. एका सर्व्हनुसार एआयचे एक वर्षापूर्वी तीन बिलियन डॉलर योगदान होते व सन 2030 पर्यंत ते मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्यादृष्टीने आपण आगामी काळात काम केले पाहिजे.

डॉ. एस. सोमनाथ म्हणाले, इस्रोमध्ये काम करताना एरोनोटीकल सोसायटीकडे आम्ही आकर्षित झालो. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. देशभरातील एरोस्पेस मध्ये काम करणारे सर्व तज्ज्ञ एकत्रित आले आहेत. एरोस्पेस क्षेत्र हे बदलत्या काळात 'आत्मनिर्भर भारता'च्यादृष्टीने विकसित करण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. युवकांनी या क्षेत्रात काम करावे. कौशल्य आधारित मनुष्यबळ त्यासाठी निर्माण केले गेले पाहिजे. स्टार्टॲप, संशोधनावर भर दिला पाहिजे. 

डॉ. सतीश रेड्डी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर सन 1948 मध्ये एरोनोटीकल सोसायटीची स्थापना झाली. आज देशभरात 22 शाखा झाल्या असून एरोनोटीकल संदर्भात विविध काम करत आहे. विकसित भारतामध्ये एरोस्पेस क्षेत्रातील आव्हाने याबाबत चर्चा या परिषदेत करण्यात येत आहे. विकसित भारत अंतर्गत प्रादेशिक ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. हे एअरक्राफ्ट देशाला इतर ठिकाणी निर्यात देखील करता येईल. एरोस्पेसमध्ये देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. 

या परिषदेत हवाई क्षेत्राशी संबंधित नागरी हवाई उड्डाण, स्पेस व्हेइकल्स, सॅटेलाईट्स, एरो इंजिन्स, मिसाईल सिस्टिम्स, लढाऊ विमाने व एरोस्पेस, ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स अशा विविध विषयांवर चर्चासत्रात तज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले. स्टार्टअप व उद्योग यांच्यातील संवाद सत्राचे, विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे प्रदर्शन, तसेच विविध स्मृती व्याख्याने या परिषदेत आयोजित करण्यात आली आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.