राजीनामा देण्याचा निर्णय मी... महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगून टाकलं...

Share:
Main Image
Last updated: 09-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ फेब्रुवारी - शिवसेना मुख्य  नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः माझ्याशी चर्चा करुन गैरसमज दूर केले आहेत आणि माझ्यासह सर्व नगरसेवकांना मंगळवारी भेटण्यासाठी बोलाविले आहे. आम्ही आमची बाजू त्यांच्यासमोर मांडणार आहोत, त्यामुळे, ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार मी माझ्या महानगर प्रमुख पदाचा आणि जनभावना लक्षात घेऊन नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याचे शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

नाशिक महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडीवरुन शिवसेना पक्षात नाराज होऊन शिवसेना महानगर प्रमुख तथा प्रभाग क्र. २४ चे नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी महानगरप्रमुख पदाचा आणि नगरसेवक पदाचा सोमवारी राजीनामा देणार असल्याचे जाहीर करुन नॉट रिचेबल झाले होते. सोमवारी सकाळी प्रविण (बंटी) तिदमे यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत तिदमे यांनी सांगितले की, मी नाराज होऊन नॉट रिचेबल झालो नव्हतो. उपमहापौर पदाची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना पदाधिकारी, समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. त्याच्या भावना तीव्र होत्या. सतत फोनवर आणि घरी गर्दी करून प्रत्येक जण हेच विचारात होते की, आपले काय चुकले?, आपण कुठे कमी पडलो ? सर्वांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मी नॉट रिचेबल झालो होतो. माझ्याशी संपर्क होत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या कुटुंबियांशी संपर्क साधला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी बंटी वर अन्याय होणार नाही, त्याला तातडीने माझ्याशी संपर्क करायला सांगण्याचा निरोप कुटुंबियांना दिला. याकाळात विविध पक्षातील पदाधिकारी, ज्येष्ठ संपादक, पत्रकार, नागरिकांनी कुटुंबियांशी संपर्क साधून राजीनामा न देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर, रविवारी आणि सोमवारी सकाळी माझे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, खा. नरेश म्हस्के, आ. सुहास अण्णा कांदे, सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मशीलकर, संपर्क प्रमुख राम रेपाळे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त होतो, त्यामुळे उपमहापौरपदाबाबतचे लेखी पत्र नाशिकला पाठविण्यात आले नाही. तुझ्यावर कोणताही अन्याय होणार नाही. तू मला भेटल्याशिवाय चुकीचा निर्णय घेऊ नकोस असे स्पष्ट आदेश दिले. तुझ्यावर आणि अन्य नगरसेवकांवर अन्याय होणार नाही असे स्पष्ट त्यांनी सांगितले. त्यामुळे, एकनाथ शिंदे यांचा आदेश आणि जनभावनेचा आदर करत मी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत आमच्या काही मागण्या आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहोत. 

या पत्रकार परिषदेत राजीनामा देऊ नका अशा मागणीचे पत्र तांबोळी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे  संस्थेचे अध्यक्ष अझीझ तांबोळी आणि समाज बांधवांनी प्रविण तिदमे यांना दिले. उपमहापौर पदासाठी सव्वा वर्षाचा आणि गटनेते पदासाठी एक वर्षाचा फॉर्म्युला वापरुन सर्वांना देण्याची मागणी आम्ही पक्षाकडे मांडणार असल्याचे नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी सांगितले. नगरसेवक भागवत आरोटे यांनीही सर्वांचा सन्मान राखला जावा आणि स्थानिक पातळीवर विश्वासात घेऊन निर्णय व्हावेत अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

या पत्रकार परिषदेला नगरसेवक भागवत आरोटे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख तथा नगरसेविका सुवर्णाताई मटाले, हर्षदाताई गायकर, डॉ. पूनमताई महाले, महिला आघाडी महानगर प्रमुख अस्मिताताई देशमाने, युवासेनेचे विस्तारक योगेश बेलदार, दिव्यांग सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश वाणी, शिवसेना झोपडपट्टी सेलचे जिल्हा प्रमुख भिवानंद काळे, महानगरप्रमुख सनी रोकडे, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख सुलोचनाताई मोहिते, नाशिक मध्यचे शिवसेना उपमहानगर प्रमुख ऍड. अक्षय कलंत्री, पंचवटी विभागाचे उपमहानगर प्रमुख प्रविण काकड, अभिषेक बोरस्ते, अमोल महाले, अमोल नाईक, उपमहानगर संघटक ऍड. अजिंक्य गीते, शिवसेना कार्यालयीन प्रमुख शरद नामपूरकर, नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख बाळकृष्ण सूर्यवंशी, आकाश पवार, जीवन दिघोळे, युवासेनेचे नयन शेजवळ, शिवसेना विभाग प्रमुख अमित मांडवे, सागर जाधव, सागर मोटकरी, सुयश पाटील, आकाश साळवे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रावण पवार, आकाश कोकाटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.