पुणे, (प्रतिनिधी) ९ फेब्रुवारी - राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रकृतीतील बिघाड लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यात आणले जात आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या ताफ्यासोबत एक कार्डियाक रुग्णवाहिका देखील तैनात करण्यात आली असून हा ताफा वेगाने पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.
नेमकी काय आहे परिस्थिती?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून शरद पवार सातत्याने दौऱ्यावर होते. वाढत्या वयानुसार आणि दगदगीमुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचे समजते. प्रकृतीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुण्यातील नामांकित रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दौरे रद्द, कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण
शरद पवार यांच्या प्रकृतीची बातमी समजताच राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे पुढील काही नियोजित कार्यक्रम आणि दौरे तूर्तास स्थगित करण्यात आले आहेत. पुण्यातील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज ठेवण्यात आली असून, लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत हेल्थ बुलेटिन जारी होण्याची शक्यता आहे.
पवार यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय आणि वैद्यकीय पथक असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही प्रगत उपचारांसाठी त्यांना पुणे येथे हलवण्यात येत आहे.